जिल्ह्य़ात गेल्या १ जून ते ३ ऑगस्ट दरम्यान नैसर्गिक आपत्तीमुळे मोठे नुकसान झाले. या बाबत जिल्हा प्रशासनाने सरकारला अहवाल सादर केला. त्यानुसार जिल्ह्य़ात एकूण १२ जण मृत्युमुखी पडले, तर ४९ जनावरे दगावली. ५ हजार ४८५ घरांचे नुकसान झाले. ३५ हजार ४२८ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे मोठे नुकसान झाले. सततच्या पावसामुळे प्रमुख रस्त्यांचे ७११ कोटींचे नुकसान झाले. दरम्यान, नांदेड, मुदखेड तालुक्यात गत २४ तासांत अतिवृष्टीची नोंद झाली. विष्णुपुरी प्रकल्पातून ३, तर जिल्ह्यालगत इसापूर धरणाच्या ७ दरवाजातून विसर्ग सुरूअसल्याने गोदावरी व पनगंगा नदी दुथडी भरून वाहात आहे. संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
नांदेड, मुदखेड तालुक्यात गत २४ तासांत अतिवृष्टीची नोंद झाली. विष्णुपुरी प्रकल्पातून ३, तर जिल्ह्यालगत इसापूर धरणाच्या ७ दरवाजातून विसर्ग सुरूअसून गोदावरी व पनगंगा नदी दुथडी भरून वाहात आहे. संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. नांदेडमध्ये सकाळी आठपर्यंत ९९.१३ मिमी पावसाची नोंद झाली. मुदखेडमध्येही ८३.३३ मिमी पाऊस नोंदविला गेला.
संततधार पाऊस व गोदावरी नदीच्या लाभक्षेत्रात पावसामुळे विष्णुपुरी प्रकल्पाचे ३ दरवाजे उघडले. त्यातून ८०० ते ९०० क्युसेक वेगाने विसर्ग सुरू होता. गोदावरीच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने ही नदी दुथडी भरून वाहात आहे. नदीने धोक्याची पातळी गाठली नसली, तरी आणखी दोन दिवस असाच पाऊस राहिल्यास नांदेडला पूरपरिस्थिती निर्माण होऊ शकते, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. मराठवाडय़ात जायकवाडीच्या पाणीसाठय़ाबाबत चिंता व्यक्त केली जात असताना नांदेडचा विष्णुपुरी प्रकल्प मात्र पूर्ण भरला.
दोन दिवसांपूर्वी नुकसानीचा अहवाल पाठविण्यात आला. १ जून ते ३ ऑगस्ट दरम्यान जिल्ह्य़ात अतिवृष्टी झाली. किनवट, माहूर, हदगाव, हिमायतनगर, भोकर तालुक्यात प्रामुख्याने सर्वाधिक पाऊस झाला. या पावसामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले. जिल्ह्य़ात एकूण १२ व्यक्ती मरण पावल्या. यात ७ जणांचा मृत्यू अंगावर वीज पडून झाला. तीनजण पुरात वाहून गेले व अंगावर भिंत पडल्यामुळे एकाचा मृत्यू झाला. मृतांपैकी सहाजणांच्या वारसांना शासकीय मदत मिळाली.
नैसर्गिक आपत्तीमुळे २५ लहान व २४ मोठे अशी एकूण ४९ जनावरे दगावली. यातील १६ प्रकरणात पशुपालकांना मदत देण्यात आली. २ लाख ५१ हजार रुपये किमतीचे हे पशुधन होते. अतिवृष्टीमुळे घरांचीही मोठी पडझड झाली. एकूण ५ हजार ४८५ घरांचे नुकसान झाले. पैकी १०९ घरांची पूर्ण पडझड झाली. अंशत: नुकसानग्रस्त घरांची संख्या ५ हजार ३७६ आहे. हदगाव तहसीलदारांनी तालुक्यातील २ हजार २०७ घरांचे नुकसान झाले.
अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे, फळबागांचे तसेच खरडून गेलेल्या जमिनीचे संयुक्त पथकामार्फत सर्वेक्षणाचे काम सुरू केले. प्राथमिक अहवालानुसार जिल्ह्य़ात ५० टक्क्य़ांपेक्षा कमी बाधीत क्षेत्र ३६ हजार ८४५ हेक्टर असून ५० टक्क्य़ांपेक्षा अधिक बाधीत क्षेत्र ३५ हजार ४२८ हेक्टर आहे. यातील बाधीत शेतकऱ्यांची संख्या ४१ हजार ४० आहे. कापूस, ज्वारी, तूर, सोयाबीन, धान, मूग, उडीद, हळद तसेच केळी या पिकांचे नुकसान झाले. सर्वाधिक नुकसान कापसाचे झाले. १६ हजार ३०३ हेक्टर क्षेत्रावरील कापसाचे नुकसान झाले.
दरम्यान, २ हजार ५०७ हेक्टर क्षेत्रावरील जमीन पूर्णपणे खरडून गेली. किनवट तालुक्यात ७८ हेक्टर जमीन पुरामुळे वाहून गेली. याच तालुक्यात सर्वाधिक म्हणजे २ हजार २२ हेक्टर शेतजमीन अतिवृष्टीमुळे खरडून गेली. पावसामुळे राष्ट्रीय महामार्ग, इतर जिल्हा मार्ग तसेच ग्रामीण रस्ते, लहान पूल, नाल्या, साठवण तलाव, कोल्हापुरी बंधारे, पाझर तलाव, लघु तलाव, प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांचेही नुकसान झाले. एकूण ७११ कोटी ६४ लाख ८३ हजार रुपयांचे नुकसान झाले.
अतिपावसाने मारले, प्रशासनाने फटकारले!
वार्ताहर, हिंगोली
जिल्ह्य़ात अतिवृष्टीचा तडाखा सुरूच असून, सोमवारी रात्रीही पडलेल्या जोरदार पावसामुळे सर्वत्र खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी चांगलाच अडचणीत सापडला. रात्रभर पडलेल्या पावसामुळे पीक नुकसानीत आणखी भर पडली आहे.
मदत व पुनर्वसनमंत्री पतंगराव कदम जिल्ह्य़ातील नुकसानीचा आढावा घेणार आहेत. तत्पूर्वी उद्या (बुधवारी) पालकमंत्री वर्षां गायकवाड नुकसानीचा आढावा घेणार आहेत. या पाश्र्वभूमीवर प्रशासकीय यंत्रणा सर्वेक्षणाचे कागदी घोडे नाचवत असून दररोज गावा-गावांतील शेतक ऱ्यांना पीक नुकसानीचे पंचनामे करून मदत देण्याची मागणी होत आहे.
जिल्ह्य़ात ३ लाख ४० हजार हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांची पेरणी झाली. जिल्ह्य़ातील पावसाची सर्वसाधारण सरासरी ८९२.९ मिमी आहे. मात्र, दोन महिन्यांत सलग पडलेल्या पावसाने नदी-नाल्यांना पुरात पिकांसह जमिनीही खरडून वाहून गेल्या. उर्वरित जमिनीला शेततळ्यांचे स्वरूप आल्याने पिके पिवळी पडून वाढ खुंटली. आता उत्पादनांची अपेक्षाच उरली नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
मंत्रालयातून पीक नुकसानीच्या सर्वेक्षणाचे आदेश आल्याने जिल्हा प्रशासन मात्र नद्या-नाले, ओढय़ाकाठच्या पीक नुकसानीवरील नोंदी घेत आहेत. शेततळ्यांचे स्वरूप धारण करणाऱ्या, वाढ खुंटलेल्या व इतर पीक नुकसानीकडे दुर्लक्ष करीत असल्याच्या शेतकरी वर्गातून तक्रारी वाढल्या आहेत. ३ लाख ४० हजार हेक्टरवर पेरणी झालेली असताना प्रशासन मात्र २० ते २२ हजार हेक्टरवरील पिकांचेच नुकसान झाल्याचे दर्शविण्याची सूचना देत असल्याने न्याय मिळण्याची शक्यता कमीच असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगितले जात आहे.