पनवेलमध्ये सतत दोन दिवस कोसळणाऱ्या जलधारांमुळे शुक्रवारी जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले. गेल्या २९ तासांत पनवेलमध्ये १८७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. गुरुवारी २४ तासांत पडलेल्या १२७ मिलीमीटर पावसाने शुक्रवारी पाच तासांमध्ये तब्बल ४७ मिलिलिटरची भर घातली.
पावसाचा मोठा फटका उपनगरी रेल्वेला बसल्याने बहुतांश चाकरमान्यांनी पावसाच्या बहाण्याने शुक्रवारी अघोषित सुटीचा आनंद लुटला. त्यातच शुक्रवार असल्याने अनेकांनी दारूची दुकाने व मांसाहाराच्या दुकानांसमोर गर्दी केली होती. शाळाचालकांना तसेच पालकांना सकाळी पावसाचा अंदाज न आल्याने अनेक शाळा विद्यार्थ्यांनी गजबजल्या होत्या. मात्र पाऊस कोसळतच राहिल्याने खबरदारीचा उपाय म्हणून अनेक शाळा लवकर सोडण्यात आल्या. यामुळे पालकांची चांगलीच तारांबळ उडाली. पनवेल नगर परिषद हद्दीतील सखल भागात पावसाचे पाणी साचण्याचे प्रकार कमी झाले, मात्र यंदा विजेच्या लपंडावाचा मोठा फटका नागरिकांना सहन करावा लागला.
आज शुक्रवारच्या पावसाने पनवेल तालुक्यात सर्वाधिक फटका माजी आमदार विवेक पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित महाआरोग्य शिबिराला बसला. ६० हजार महिलांनी या आरोग्य शिबिरासाठी नोंदणी केली होती, मात्र निवाऱ्यासाठी बांधलेल्या छपरांमध्ये खालून पाणी शिरल्याने अनेक महिलांची आरोग्य तपासणी ओल्या पावलानेच करावी लागले. शेकाप कार्यकर्त्यांच्या मेहनतीवर शुक्रवारच्या पावसाने विरजण घातले. कळंबोली वसाहतीच्या तळमजल्यावरील नागरिकांनाही या पावसाचा फटका बसला. मलनिस्सारण व गटारांचे पाणी खेचणारे सिडकोचे पंप बंद असल्याने या घरांच्या शौचालयात सांडपाणी शिरले.

विना रेनकोटचे नवी मुंबई पोलीस
पावसाचा फटका वाहतूक पोलिसांना बसला. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील पोलिसांना रेनकोट न दिल्याने त्यांची वाताहत झाली. काही पोलिसांनी पिवळ्या रंगाचे रेनकोट विकत घेतले असून त्यावर पोलीस चक्राचे चिन्ह लावून ते वाहतुकीचे नियमन करीत आहेत, तर नवीन पोलीस आयुक्तांना याची जाणीव होईल का, या प्रतीक्षेत काही पोलीस आहेत.

उरणमध्ये नालेसफाईचे दावे फोल
उरणमधील गावांच्या नालेसफाईसाठी सिडकोने पावसाळ्यापूर्वी दीड कोटी रुपये, तर उरण नगरपालिका तसेच विविध ग्रामपंचायती व जेएनपीटी व्यवस्थापनाने कोटय़वधी रुपये खर्च केले आहेत. मात्र पहिल्या पावसातच या नालेसफाईची पोलखोल झाली असून तालुक्यातील अनेक गावांत पावसाचे पाणी शिरले आहे. या पाश्र्वभूमीवर, जुलैमध्ये तसेच मोठय़ा भरतीच्या वेळी गंभीर स्थिती निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
भरतीच्या पाण्यामुळे व रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे उरण तालुक्यातील करंजामधील कोंढरीपाडा, जसखार, भेंडखळ, पागोटे, कुंडेगाव, केगाव आदी गावांतील सखल भागांत पाणी शिरले आहे. त्यामुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले असून पाणी काढण्याचा प्रयत्न केला जात आहे.
जसखार तसेच भेंडखळ, कुंडेगाव, पागोटे सिडको परिसरात व केगावमध्ये दरवर्षी पावसाचे पाणी शिरते. या संदर्भात उरणचे तहसीलदार नितीन चव्हाण यांनी केगावमधील एका घरात पाणी शिरल्याची तसेच करंजा कोंढरी येथे काही प्रमाणात पाणी शिरल्याची माहिती दिली. उरणमध्येही जोरदार पाऊस झाल्याने शहरातील रस्तेही दुथडी भरून वाहत होते. अनेक ठिकाणी दुचाकी वाहने तसेच रिक्षा बंद पडत होत्या, तर उरण-पनवेल राज्य महामार्गावरील जेएनपीटी कामगार वसाहत, नवघर फाटा येथील रस्त्यावर पाणी साचल्याने वाहनांना पाण्यातूनच मार्ग काढावा लागत होता.
अनेक गावांच्या शेजारी पाणी साचल्याने गावाभोवताली तळे साचल्याचे चित्र निर्माण झाले होते. या संदर्भात सिडकोच्या द्रोणागिरी नोडचे कार्यकारी अभियंता अशोक माने यांच्याशी संपर्क साधला असता भेंडखळ गावात काही प्रमाणात पाणी साचल्याचे सांगून पोकलेन तसेच जेसीबी व वॉटर पंप लावून साचलेले पाणी काढले जात असल्याचे त्यांनी सांगितले.