कोयना धरण परिसरात पावसाचा जोर चांगलाच वाढला असून, धरणाखालील कृष्णा, कोयना नद्यांकाठीही सर्वत्र संततधार पर्जन्यवृष्टी सुरू आहे. मुसळधार पावसामुळे कोयना धरणाच्या पाणीसाठय़ात समाधानकारक वाढ होत आहे. गतवर्षीच्या तुलनेत सध्या धरणाचा पाणीसाठा सुमारे साडेचार टीएमसीने जादा आहे. तर धरणाखालील पाटण व कराड तालुक्यात पावसाची संततधार असल्याने कृष्णा, कोयना नद्यांच्या पाणीपातळीतही वाढ झाली आहे. गेल्या ३६ तासांत कोसळलेल्या पावसामुळे बळीराजा सुखावला असून, शेतीच्या कामांनी चांगलीच गती घेतली आहे. दरम्यान, आज दिवसभरातील संततधारेमुळे कराड व पाटण तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर महामार्गावरील वाहतूकही संथ गतीने सुरू होती.
कोयना धरणाच्या जलपातळीत दीड फुटाने वाढ होताना, आज सायंकाळी ५ वाजता धरणाची ही जलपातळी २ हजार ८३ फूट २ इंच आहे. तर पाणीसाठा ३३.६५ टीएमसी म्हणजेच ३१.९७ टक्के आहे. पैकी २८.४० टीएमसी पाणीसाठा उपयुक्त आहे. गेल्या पाच-सहा दिवसांत कोसळलेल्या कमी अधिक प्रमाणातील पावसामुळे शेतीच्या कामात शेतकरी वर्गाने कंबर कसली आहे. आज सकाळी आठ वाजेपर्यंत गेल्या २४ तासांत कोयना धरण क्षेत्रात सरासरी ७२ एकूण ४३८, पाटण तालुक्यात २४.३३ एकूण १६५.८३ तर, कराड तालुक्यात ३.६७ एकूण ५३.७७ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. आज दिवसभरात कोयना धरण क्षेत्रातील नवजा विभागात सर्वाधिक १५९ एकूण ५७४, कोयनानगर विभागात १३५ एकूण ५९४, तर महाबळेश्वर विभागात ८० एकूण ४९४ मि. मी. पाऊस होताना दिवसभरातील सरासरी पावसाची नोंद १२४.६६ मि. मी. झाली आहे.
एकंदर पावसात कोयना धरण क्षेत्रात कोयनानगर व महाबळेश्वर विभागात सर्वाधिक ५९४ मि. मी., पाटण तालुक्यात पाटण विभागात सर्वाधिक २०३ मि. मी. तर चाफळ विभागात सर्वात कमी २५ मि. मी. एकंदर पावसाची नोंद झाली आहे. कराड तालुक्यात कोळे मंडलात सर्वाधिक १०६.३ तर, इंदोली मंडलात सर्वात कमी १२.३ मि. मी. इतक्या नगण्य पावसाची नोंद झाली आहे. शासनाकडून नवीन ३ पर्जन्यमापक यंत्र पाटण प्रशासनाकडे आली असून, ही यंत्रे पाटण तालुक्यातील कुठरे, मोरगिरी व म्हावशी येथे बसविण्यात आली आहेत. प्रारंभीच्या ३ दिवसात कुठरे विभागात २४, मोरगिरी  विभागात १३ व म्हावशी विभागात २२ मि. मी. पावसाची नोंद या नव्या पर्जन्यमापक यंत्रावर झाली आहे. आज दिवसभरात कराड व पाटण तालुक्यात ढगाळ वातावरण राहताना संततधार पाऊस कोसळल्याने जनजीवन विस्कळीत राहिल्याचे वृत्त आहे.