वाई-पाचगणी-महाबळेश्वर परिसरात अचानक झालेल्या बिगर मोसमी पावसाने गहू,ज्वारी व स्ट्रॉबेरी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. वाई-पाचगणी महाबळेश्वर भागात बिगरमोसमी पाऊस झाल्याने पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. अचानक आलेल्या पावसाने शेतकरी,पर्यटक विक्रेत्यांची पाचगणी, महाबळेश्वर येथे तारांबळ उडाली. या भागात पंधरा ते वीस मिनिटे तर काही भागात अर्धातास जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे ज्वारी, गहू, हरबरा या पिकांचे नुकसान झाले. ज्वारी काळी पडण्याची व त्यावर चिकटा रोग पडण्याची शक्यता निर्माण झाली. वाईच्या पश्चिम भागात मांढरदेव येथेही पाऊस झाला. पाचगणी, भिलार, महाबळेश्वर भागात पाऊस झाला. ऐन बहरात आलेल्या स्ट्रॉबेरीच्या पिकालाही फटका बसला असून वाई, पाचगणी, महाबळेश्वर येथे स्ट्रॉबेरीचा हंगाम जोरात असताना हा पाऊस झाला आहे. येथील स्ट्रॉबेरीला पुणे, मुंबई तसेच गुजरातमधून मोठी मागणी आहे. हवेत बदल होऊन थंडी जाऊ लागली होती त्यात आज कोसळलेल्या पावसाने हवेत गारवा आला आहे.