शहरात झालेल्या अतिवृष्टीमुळे विविध भागात जीवित हानीसोबत वित्तहानी मोठय़ा प्रमाणात झाली आहे. पूल व रस्त्यांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. झोन पातळीवर केलेल्या सर्वेक्षणातून शहरातील मालमत्तेचे झालेले नुकसान १८ कोटींच्या जवळपास असून त्या बाबतचा अहवाल शासनाला पाठविण्यात येणार आहे.
शहरात गेल्या महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. पावसाने तिघांचे जीव गेले तसेच शंभरावर घरांची पडझड झाली. नियमानुसार जिल्हा प्रशासनातर्फे लाभार्थीना १ हजार रुपये प्रमाणे १.७८ कोटी रुपयांच्या मदतीचे वाटप केले. पावसामुळे शहरातील काही पूल क्षतिग्रस्त झाले आहेत. नदी व नाल्याच्या संरक्षक भिंती खचल्या आहेत. रस्त्याचेही मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. म्
ाहापौर अनिल सोले यांनी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. पावसामुळे शहराला १०० कोटींचा तडाखा बसल्याची शंका व्यक्त करून शासनाने नुकसान भरपाई देण्याची मागणी त्यांनी  केली. महापौरांच्या निर्देशानुसार प्रशासनाने झोनपातळीवर सर्वेक्षण केले असून त्यात नुकसानीचा आढावा घेण्यात आला.
महापालिकेच्या सर्वेक्षणानुसार, संपत्तीचे १८ कोटींचे तर नागपूर सुधार प्रन्यासचे २० कोटींची हानी झाली आहे. नियमानुसार नैसर्गिक आपत्तीमध्ये नुकसान झाल्यास शासनाच्या सेंट्रल रिलिफ फंडातून मदत दिली जाते, परंतु त्यासाठी नुकसानीची आकडेवारी सादर करणे आवश्यक आहे. त्यानुसार झोनपातळीवर सर्वेक्षण करून आकडेवारी तयार करण्यात आली आहे. सोबतच विदर्भात ओला दुष्काळ जाहीर केला जाण्याची शक्यता असल्याने नुकसानीची भरपाई सीआरएफमधून मिळण्याच्या आशाही वृद्धिंगत आल्या आहेत. याशिवाय १५ जुलै रोजी पावसाने शहराला तडाखा दिला होता. यावेळी शहरातील अनेक वसाहती जलमय होऊन नुकसान झाले आहे. नुकसानीची आकडेवारी एकत्र करून शासनाकडे मदतीचा प्रस्ताव पाठविण्यात येणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली.