News Flash

मृग बरसला, आद्र्रा बरसणार का?

गेल्या रविवारपासून मुंबई आणि उपनगरात सुरू झालेल्या पावसाने आपला मुक्काम येथेच ठोकला आहे. पारंपरिक आडाखे, पावसाचे नक्षत्र आणि पावसाचे वाहन यानुसार यंदा मृग नक्षत्र सुरू

| June 19, 2013 08:53 am

गेल्या रविवारपासून मुंबई आणि उपनगरात सुरू झालेल्या पावसाने आपला मुक्काम येथेच ठोकला आहे. पारंपरिक आडाखे, पावसाचे नक्षत्र आणि पावसाचे वाहन यानुसार यंदा मृग नक्षत्र सुरू झाल्यापासून दमदार पाऊस होत असून मृगाप्रमाणेच आद्र्रा नक्षत्रातही पाऊस बरसणार का याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
दरवर्षी ७ जून रोजी मुंबईत पाऊस सुरू होतो. दोन-चार दिवस टिकतो आणि नंतर मात्र जो गायब होतो तो जून महिन्याची अखेर किंवा जुलै महिन्यातच पुन्हा सुरू होतो, असा मुंबईकरांचा गेल्या काही वर्षांतील अनुभव.  पण यंदा पावसाने हा अनुभव खोटा ठरवत आत्तापर्यंत दमदार हजेरी लावली आहे. यंदा ८ जून रोजी सूर्याने पहाटे ५ वाजून ३५ मिनिटांनी मृग नक्षत्रात प्रवेश केला. मृग नक्षत्र २१ जूनपर्यंत असून त्याचे वाहन हत्ती आहे.
पारंपरिक आडाखे आणि पंचांगातील अंदाजानुसार पावसाचे नक्षत्र आणि त्याचे वाहन याचा पाऊस पडण्याशी संबंध असतो. पाण्याशी संबंधित असलेल्या ‘हत्ती’, ‘मोर’, ‘बेडूक’, म्हैस’ या प्राण्यांची वाहने असतील तर पाऊस चांगला होणार अशी समजूत आहे. यंदा मृग नक्षत्रात ‘हत्ती’ हे वाहन असल्याने या कालावधीत पाऊस चांगला होईल, असा अंदाज होता, तो खरा ठरला. ८ जून रोजी शनिवारी रात्रापासून मुंबई शहर आणि उपनगरात पावसाला सुरुवात झाली. रविवार, ९ जून रोजी सकाळपासून पावसाने धरलेली संततधार मंगळवापर्यंत कायम आहे.
२२ जून रोजी सूर्य पहाटे ४ वाजून ३३ मिनिटांनी आद्र्रा नक्षत्रात प्रवेश करत असून त्याचे वाहन ‘बेडूक’ आहे. ‘बेडूक’ हा प्राणीही पाऊस व पाण्याशी संबंधित असल्याने मृग नक्षत्राप्रमाणेच ‘आद्र्रा’नक्षत्रातही पाऊस बरसणार का, त्याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. ‘आद्र्रा’ नक्षत्र ५ जुलैपर्यंत असून येत्या ६ जुलै रोजी पहाटे ४ वाजून ८ मिनिटांनी सूर्य पुनर्वसू नक्षत्रात प्रवेश करणार आहे. त्याचे वाहन ‘गाढव’ असणार आहे. पारंपरिक आडाख्यानुसार ‘गाढव’ वाहन असेल तर या काळात पाऊस मोठय़ा प्रमाणात पडत नाही. त्यामुळे सध्या सुरू झालेला पाऊस आता ५ जुलैनंतरच विश्रांती घेईल, अशी एक शक्यता आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 19, 2013 8:53 am

Web Title: heavy rain will continue or not
Next Stories
1 एक लाख ९० हजारांचे मशीन, पालिकेची तीन लाखांना खरेदी
2 शिडी!
3 भाषेच्या वैभवासाठी अर्थव्यवस्थेचे पाठबळ महत्त्वाचे -गिरीश कुबेर
Just Now!
X