येणार, येणार म्हणून उकाडय़ाने घामाच्या धारा अंगावर घेत चातकासारखी ज्याची वाट पाहात महिना घालविला त्या पावसाने दोन दिवसांपासून उरण तालुक्यात आपली अखेर हजेरी लावली असून बुधवारी उरणमध्ये पावसाला चांगलीच सुरुवात झालेली आहे. कधी रिमझिम तर कधी मुसळधार असा पाऊस उरणमध्ये बरसत असल्याने वातावरणात थोडासा गारवा निर्माण झाल्याने या पावसाच्या सरीने उरणकर आणि बळीराजा सुखावला आहे.
पाऊस लांबल्याने उरणमध्ये पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली नसली तरी पाऊस हा गरजेचा आहे. पावसाळ्याच्या महिन्यात पाऊस न झाल्यास पुढील काळातील पाण्याची व्यवस्था कशी होणार याची चिंता आता शहरातीलही मंडळी करू लागली होती. तर दुसरीकडे तालुक्यातील ग्रामीण भागात भाताची रोपे पावसाअभावी करपू लागली होती. मात्र गेल्या दोन दिवसांपासून बरसणाऱ्या पावसाने रोपे पुन्हा तरारू लागली आहेत. पावसाने जोर धरल्यास पाणीकपातीची वेळ येणार नसल्याने शहरी भागातील नागरिक काहीसा निर्धास्थ झाला आहे.