नेवासे तालुक्यातील नागापूर येथे सुरू असलेल्या सदगुरू गंगागिरी महाराजांच्या १६६ व्या हरिनाम सप्ताहात शनिवारी गर्दीचा उच्चांक झाला. महंत रामगिरी महाराजांच्या प्रवचनाला सुमारे ४ लाख भाविक उपस्थित होते. उद्या (रविवार) सप्ताहाची सांगता होणार असून काल्याच्या किर्तनाला ५ लाख भाविक उपस्थित राहतील असा अंदाज आहे.  
महंत रामगिरी महाराज म्हणाले, राजकारणी लोकांनी व सत्ताधाऱ्यांनी धर्मरक्षणाचे कार्य केलेच पाहिजे. त्यांचा धर्म त्यांनी पाळलाच पाहिजे. समाजात पती, पत्नी, मुलगा, आई सर्वानी आपआपली कर्तव्य जबाबदारीनी पार पाडावी, म्हणजे सर्व समाज व्यवस्थित चालतो. धर्मावर आक्रमण झाल्यास व राजा आपले कर्तव्य विसरल्यास साधू-संताना धर्मरक्षणासाठी पुढाकार घ्यावा लागेल.
हरिनाम सप्ताहामध्ये विविध उपक्रम केले जात आहेत. त्यात आज नागेबाबा पतसंस्थेच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. १६६ रक्तदात्यांचा संकल्प यावेळी करण्यात आला. आज ३८ जणांनी रक्तदान केले. शुक्रवारी वरूर व बेलपिंपळगाव जिल्हा परिषद गटातून भाकरी गेाळा करण्यात आल्या. त्यात राहुरी, श्रीरामपूर, कोपरगाव, वैजापूर आदी तालुक्यातुनही पारंपारिक उत्साहात गाडय़ा सजवून मिरवणुकीने गाडय़ा भरभरून भाकरी येत आहेत. शनिवारी एकादशी असल्याने २७० पोते शाबुदाणा खिचडीचे प्रसादाचे वाटप करण्यात आले.