पाम बीच, ठाणे-बेलापूर मार्ग हाउसफुल्ल
*    अंतर्गत रस्त्यांवर वाहनांच्या रांगा
*    शीव-पनवेल रस्त्यांच्या दुरवस्थेचे भोग
*    मुंब्रा वळणरस्त्यांवरील वाहतुकीचा त्रास कायम

अंतर्गत वाहतुकीचेही तीनतेरा
दरम्यान, मुंबई-ठाण्याहून पनवेलच्या दिशेने जाणारी वाहने शीव-पनवेल महामार्गाचा फेरा चुकविण्यासाठी कोपरी पुलावरून वाशीत शिरून पाम बीच मार्गावर येत असल्यामुळे कोपरी, बोनकोडे, वाशीतील अंतर्गत वाहतुकीचे तीनतेरा वाजले आहेत. नवी मुंबई महापालिकेच्या अखत्यारीत नसलेल्या रस्त्यांच्या दुर्दशेचे बळी नवी मुंबईकर ठरू लागले असून राज्य सरकारने याची दखल घेण्याची गरज आहे, अशी प्रतिक्रिया महापौर सागर नाईक यांनी व्यक्त केली. कोपरखैरणे, घणसोली, तळवलीतील अंतर्गत रस्त्यांवरही या वाहतुकीचा भार वाढू लागला आहे. सीबीडी परिसरात सिडको भवनच्या दिशेने ये-जा करणाऱ्या वाहनांच्या संख्येत दुपटीने वाढ झाली आहे. वाढलेल्या वाहनांचा भार नवी मुंबईतील रस्त्यांनी किती दिवस पेलायचा, असा सवालही महापौरांनी उपस्थित केला.

जयेश सामंत, नवी मुंबई  
शीव-पनवेल महामार्गाची झालेली दुरवस्था, मुंब्रा वळणरस्ता खचल्यामुळे वाहतूक नियोजनाचा उडालेला बोजवारा, शरपंजरी पडलेला शीळ-महापे रस्ता आणि ठाणे-पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांच्या संख्येत झालेली वाढ यामुळे गेल्या महिनाभरापासून नवी मुंबईतील अंतर्गत रस्त्यांवर वाहनांच्या संख्येत तिपटीने वाढ झाली असून ऐरोली, वाशी, कोपरखैरणे, बेलापूर यासारख्या उपनगरांमधील रस्त्यांवर दिवसेंदिवस या वाहनांचा फास घट्ट होऊ लागल्याचे चित्र आता दिसू लागले आहे.
दररोज ५० ते ६० हजार वाहनांची क्षमता नजरेपुढे ठेवून बनविण्यात आलेल्या ठाणे-बेलापूर रस्त्यावर शुक्रवारी दिवसभरात दीड लाख वाहनांची रेकॉडब्रेक अशी वाहतूक झाल्यामुळे स्थानिक वाहतूक पोलीसही चक्रावून गेले आहेत. विशेष म्हणजे, शीळ-पनवेल महामार्गाच्या दुरवस्थेमुळे एरवी हलक्या वाहनांसाठी उभारण्यात आलेल्या पाम बीच मार्गावर दिवसाला सुमारे ३८ ते ४० हजार वाहनांची ये-जा सुरू झाली आहे. ठाणे-बेलापूर रस्त्यावरील कोपरी पुलावरून वाशीच्या दिशेने येणाऱ्या वाहनांच्या संख्येतही दुपटीने वाढ झाली असून अंतर्गत वाहतुकीसाठी बनविण्यात आलेले रस्ते या वाहतुकीचा भार पेलू शकतील का, असा प्रश्न सध्या महापालिकेतील अभियंत्यांना पडला आहे. दिवसागणिक वाहनांच्या संख्येत होणारी वाढ हे सर्वच प्रमुख शहरांच्या वाहतूक व्यवस्थेपुढील मोठे आव्हान मानले जात असले तरी गेल्या महिनाभरापासून नवी मुंबईतील अंतर्गत रस्त्यांवर दुपटीने वाढलेली वाहने नेमकी कोठून आली याचा शोध सध्या स्थानिक पोलीस आणि महापालिकेचे अभियंते घेत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून शीव-पनवेल माहामार्गाच्या रुंदीकरणाचे काम सुरू असून हे काम अतिशय धीम्या गतीने सुरू असल्याचे चित्र अगदी स्पष्टपणे दिसू लागले आहे. बेलापूर िखडीपासून डी.वाय.पाटील स्टेडियम तसेच पुढे सानपाडय़ापर्यंत अतिशय धीम्या गतीने सुरू असलेल्या या कामामुळे महामार्गावरून निघालेली बहुतांश वाहने बेलापूरमार्गे पाम बीच मार्गावर येत आहेत. बेलापूर ते वाशी हे १३ किलोमीटरचे अंतर कापण्यासाठी उभारण्यात आलेल्या पाम बीच मार्गाची बांधणी अंतर्गत वाहतुकीच्या सोयीसाठी करण्यात आली आहे. या मार्गावरून दिवसाला १० ते १५ हजार वाहनांची ये-जा करतील, असे गृहीत धरण्यात आले होते. शीव-पनवेल महामार्गाच्या दुरवस्थेमुळे पाम बीच मार्गावरून दिवसाला ३५ ते ३८ हजार वाहने प्रवास करत आहेत, अशी माहिती नवी मुंबई वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजय पाटील यांनी वृत्तान्तला दिली. शुक्रवारी तसेच रविवारी या मार्गावरील वाहतुकीचा भार आणखी वाढतो, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.

ठाणे-बेलापूर रस्त्यावर वाहनांचा महापूर
मुंब्रा वळणरस्ता खचल्यामुळे ठाणे-बेलापूर रस्त्यावरही वाहनांच्या संख्येत मोठी वाढ झाली असून सुमारे एक ते सव्वा लाख वाहने या रस्त्यावरून ये-जा करत आहेत, अशी माहिती नवी मुंबई महापालिकेचे शहर अभियंता मोहन डगावकर यांनी दिली. या रस्त्याची बांधणी करतानाही मुंब्रा वळणरस्त्याची वाहतूक या ठिकाणाहून वळविण्यात आली होती. हा रस्ता पूर्णत: काँक्रिटचा असला तरी त्यावरून दिवसाला किती वाहने जावीत, याचे काही निकष ठरविण्यात आले होते. मात्र मुंब्रा वळणरस्त्यावरील अवजड वाहनांचा भार सातत्याने या रस्त्यावर
पडत असल्याने वाहन क्षमतेचे नियोजन केव्हाच ढासळले आहे, असे डगावकर यांनी स्पष्ट केले. कोपरीमार्गे वाशीत येणाऱ्या वाहनांच्या संख्येत मोठय़ा प्रमाणावर वाढ झाली असून येथून २५ ते ३५ हजार वाहने शहरात शिरू लागली आहेत, अशी माहिती महापालिकेचे कार्यकारी अभियंता संजय देसाई यांनी दिली. पूर्वी हे प्रमाण १० हजार वाहनांच्या
आसपास होते.