लोकसभा निवडणुकीला जेमतेम २०-२५ दिवसांचा कालावधी शिल्लक असताना राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम करत भारतीय जनता पक्षात प्रवेश करून भिवंडीसारख्या काँग्रेसच्या बालेकिल्ल्यातून खासदार झालेले कपिल पाटील यांनी कल्याणात भाडय़ाने घेतलेले कार्यालय मिळविण्यासाठी सर्वपक्षीय उमेदवारांमध्ये सध्या जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे. पाटील यांची उमेदवारी जाहीर होताच त्यांनी कल्याणच्या शिवाजी चौकातील एक मोक्याची जागा भाडय़ाने घेतली. या जागेचा ताबा महापालिकेकडे आहे. पाटील यांनी या जागेतूनच प्रचाराचा नारळही फोडला. या जागेचा महिमा लक्षात घेऊन शिवसेना आणि काँग्रेसमध्ये आता या ठिकाणी निवडणूक कार्यालय थाटण्यासाठी रस्सीखेच सुरू झाली असून त्यासाठी या दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते हमरीतुमरीवर आल्याचे चित्र आहे.    
कल्याणमधील शिवाजी चौक हा शहराचा केंद्रिबदू मानला जातो. या चौकालगत असलेल्या एका पडक्या इमारतीस लागून महापालिकेची मोकळी जागा आहे. कपिल पाटील यांनी याच ठिकाणी शामियाना टाकून कार्यालय उभे केले होते. या जागेस लागूनच काँग्रेस कार्यालयाची भव्य जागा आहे. हे कार्यालय काँग्रेस उमेदवाराला पावले नाही म्हणून लाभदायक नसल्याचा समज येथील काँग्रेस कार्यकर्त्यांनी करून घेतला आहे. त्यामुळे पक्षाचे भव्य असे कार्यालय सोडून आता काँग्रेसने महापालिकेच्या ‘त्या’ मोकळ्या जागेवर निवडणूक कार्यालय उभारण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. भर वस्तीत या कार्यालयाची जागा आहे. या ठिकाणी ये-जा करणे कार्यकर्त्यांनाही सोयीचे आहे. काँग्रेस कार्यालयही तसे मोक्याच्या ठिकाणी आहे. परंतु विश्वनाथ पाटील यांच्या पराभवामुळे कल्याण पश्चिमेतील उमेदवारास ते नकोसे झाले आहे. काँग्रेसमधील एका गटाने शिवाजी चौकातील कपिल पाटील यांनी थाटलेल्या जागी काँग्रेसचे प्रचार कार्यालय थाटण्याच्या हालचाली सुरू केल्या. याची कुणकुण शिवसैनिकांना लागताच त्यांनी काँग्रेसच्या प्रयत्नात अडथळे आणले.
गुरुवारी रात्री या जागेवर ताबा मिळविण्यासाठी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये हमरीतुमरी झाली. पोलिसांनी हस्तक्षेप केल्यामुळे पुढील अनर्थ टळला असला तरी कल्याणातील हे ‘मंगल’ कार्यालय कुणाच्या पदरात पडणार या विषयी मात्र राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.