उष्णतेच्या तीव्र लाटेमुळे जिल्हय़ात सिंचन प्रकल्पातील पाण्याचा साठा झपाटय़ाने कमी होत असून नलेश्वर व चंदई प्रकल्प पूर्णत: कोरडे पडले आहेत.  घोडाझरी, आसोलामेंढा, अंमलनाला, लभानसराड या चार मोठय़ा सिंचन प्रकल्पात केवळ १८ ते २१ टक्के पाणी साठा शिल्लक असून महाऔष्णिक वीज केंद्र व चंद्रपूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या इरई धरणात ४१.२४ टक्के जलसाठा शिल्लक आहे.
 विदर्भात उष्णतेची तीव्र लाट आली असून चंद्रपुरात सलग तिसऱ्या दिवशी ४८.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद घेण्यात आली आहे. उष्णतेच्या तीव्र लाटेचा सर्वाधिक परिणाम आरोग्य तसेच कृषी विभागावर झाला आहे. जमीन अक्षरश: कोरडी ठणठणीत झाली आहे. लोकांच्या आरोग्याचेही अनेक प्रश्न निर्माण झाले आहे. सर्वाधिक परिणाम जिल्हय़ातील सिंचन प्रकल्पांवर झाला असून प्रकल्पातील पाणी साठा झपाटय़ाने कमी होत चालला आहे. या जिल्हय़ात एकूण अकरा मोठे व मध्यम सिंचन प्रकल्प आहेत. परिसरातील गावांना पाणी पुरवठा करण्याची क्षमता असलेल्या या सर्व सिंचन प्रकल्पांची अवस्था उष्णतेच्या लाटेमुळे अतिशय वाईट झाली आहे.  चंदई व नलेश्वर सिंचन प्रकल्प अक्षरश: कोरडे ठणठणीत झाले आहेत.
चंदई प्रकल्पात तर एक टक्काही पाणी शिल्लक राहिले नसून सिंचन विभागाच्या लेखी या प्रकल्पात निरंक पाणी साठा आहे. नलेश्वर प्रकल्पात केवळ ०.१७९ म्हणजे एक टक्के पाणी साठा शिल्लक राहिला आहे.  विशेष म्हणजे परिसरातील गावांना या प्रकल्पातून पाणी मिळते. आता प्रकल्पातच पाणी नसल्याने लोकांनी ओरड सुरू केली आहे. घोडाझरी व आसोलामेंढा या जिल्हय़ातील दोन मोठय़ा सिंचन प्रकल्पात अनुक्रमे ९.२४७ मि.मी. म्हणजे केवळ २१.४२ टक्के व १०.७३ म्हणजे १९.०३ टक्के पाणी साठा शिल्लक आहे. गेल्या वर्षीच्या उन्हाळय़ात याच दोन प्रकल्पात मे महिन्यात जवळपास ४० टक्के पाणी साठा शिल्लक होता. यावर्षी लोकांना तीव्र समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे. या दोन्ही प्रकल्पातून परिसरातील शेतजमिनीला पाणी पुरवठा केला जातो. तापमान असेच राहिले तर जूनच्या १५ तारखेपर्यंत परिस्थिती अतिशय वाईट राहील असे जाणकारांचे म्हणणे आहे.
पकडीगुड्डम सिंचन प्रकल्पात केवळ १.२९ मि.मी. इतका पाणी साठा म्हणजेच १०.९३ टक्के पाणी शिल्लक राहिले आहे. उष्णतेमुळे या प्रकल्पातील पाण्याचे झपाटय़ाने बाष्पीभवन होत असल्याने पाणी कमी होत चालले आहे. जूनच्या सुरुवातीलाच हा प्रकल्प कोरडा ठणठणीत होईल, असे जाणकारांचे म्हणणे आहे. वरोरा तालुक्यातील चारगाव धरणात सध्या स्थितीत केवळ २.४४५ मि.मी. इतके पाणी
शिल्लक असून केवळ १२.३० टक्के पाणी आहे. गावकऱ्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. अंमलनाला सिंचन प्रकल्पात ४.२८७ म्हणजे १७.५० टक्के पाणी शिल्लक राहिले आहे. लभानसराड प्रकल्पात १.३५१ मि.मी. पाणी म्हणजे केवळ १८.३८ टक्के पाणी शिल्लक राहिले आहे. या प्रकल्पातून काही उद्योगांना पाणी पुरवठा होत असल्याने इतकी वाईट अवस्था झाली आहे. अकरा पैकी जिल्हय़ातील सात प्रकल्पात २० टक्क्यांपेक्षा कमी शिल्लक राहिले आहे. काही प्रकल्पात तर केवळ दहा ते बारा टक्के पाणी असल्याने त्या परिसरातील शेतकऱ्यांना विविध समस्या भेडसावणार आहे. महाऔष्णिक वीज केंद्राच्या मालकीच्या इरई धरणात केवळ ७५.७०० मी.मी. पाणी साठा म्हणजेच ४१.२४ टक्के आहे. मे महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ात दरवर्षी या प्रकल्पात ५० टक्क्यांपेक्षा अधिक पाणी साठा शिल्लक राहतो. याच वेगाने इरई धरणातील पाण्याचा साठा कमी झाला तर शहरातील पाणी पुरवठय़ात कपात करावी लागेल, अशी माहिती सूत्रांनी दिली.