गाडी प्लॅटफॉर्मवर येते.. गाडीतून लवकर उतरण्यासाठी आतुर झालेला ंलोंढा गाडी थांबण्याआधीच प्लॅटफॉर्मवर उतरतो.. मात्र महिलांच्या डब्यातून खाली उतरणाऱ्या काही महिलांना प्लॅटफॉर्म आणि गाडी यांच्यातील उंचीचा अंदाजच येत नाही.. अंदाज चुकल्याने या महिला प्लॅटफॉर्मवर पडतात आणि गाडी निघून जाते.. मध्य किंवा पश्चिम रेल्वेच्या कोणत्याही स्थानकावर अगदी नेहमी आढळणारे हे दृश्य! रेल्वे प्लॅटफॉर्म आणि गाडी यांच्यातील उंची जास्त असून त्यामुळे वारंवार अपघात होतात, अशी तक्रार दोन्ही मार्गावरच्या प्रवाशांकडून होते. तांत्रिक आवश्यकता म्हणून रुळांची उंची झपाटय़ाने वाढविणारे दोन्ही रेल्वेंचे प्रशासन प्लॅटफॉर्मची उंचीही त्याच ओघात वाढविताना मात्र एकदम थंडावते. शेकडो प्राण गेले तरी मख्खपणा सोडायचा नाही, असाच रेल्वे प्रशासनाचा खाक्या आहे.
मध्य तसेच पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांनी रेल्वे प्लॅटफॉर्मची उंची वाढवण्यात यावी, अशी मागणी अनेकदा केली आहे. ही उंची जास्तीत जास्त ३५.५ सेमी (१ फूट २ इंच) असावी, असे निकष रेल्वेत आहेत. मात्र मध्य तसेच पश्चिम रेल्वेवर अनेक स्थानकांवर हे निकष धाब्यावर बसवलेले दिसतात. मध्य रेल्वेवरील ठाणे, कुर्ला, नाहूर, डोंबिवली, ठाकुर्ली या स्थानकांवरील प्लॅटफॉर्मची उंची प्रवाशांसाठी धोकादायक ठरली आहे. तर पश्चिम रेल्वेवर शब्दश: प्रत्येक स्थानकावरील प्लॅटफॉर्म भविष्यात मृत्यूचे सापळे ठरू शकतात. मध्य रेल्वेवर प्लॅटफॉर्म आणि गाडी यांच्यातील उंची १ फूट ३ इंच (३९ सेमी) ते १ फूट ५ इंच (४४ सेमी) या दरम्यान आहे. तर पश्चिम रेल्वेवर हेच प्रमाण १ फूट ४ इंच (४२ सेमी) ते १ फूट ८ (५२ सेमी) इंच एवढे आहे. गाडीत चढताना पाऊल एक फुटापेक्षा जास्त वर उचलणे, हे महिला, वृद्ध, लहान मुले, अपंग यांच्यासाठी धोकादायक ठरत आहे.
आकडेवारीवर नजर टाकली असता गेल्या दीड वर्षांत म्हणजेच जानेवारी २०१२पासून मे २०१३पर्यंत प्लॅटफॉर्म व गाडी यांच्यातील पोकळीत अडकून २८ जणांचा जीव गेला. तर २५ जणांना या अपघातात शारीरिक इजा पोहोचली. यापैकी ७ मृत्यू आणि ८ जखमी तर या वर्षांतील पाच महिन्यांमध्येच आहेत. विशेष म्हणजे अपंगांसाठी राखीव डबा ठेवणाऱ्या रेल्वेला या अपंगांना एवढय़ा उंचीवरील डब्यात चढता येईल अथवा नाही, याचे काहीच देणेघेणे नाही. प्रत्येक स्थानकातील फलाटांची उंची रेल्वेच्या प्रमाणानुसार असलेल्या जास्तीत जास्त उंचीपेक्षाही जवळपास ५ ते २० सेमी एवढी जास्त आहे.
याबाबत पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शरत् चंद्रायन यांना विचारले असता, प्लॅटफॉर्म आणि गाडी यांच्यातील उंचीचेही काही प्रमाण ठरलेले आहे, असे त्यांनी सांगितले. ही उंची जास्तीत जास्त ३५.५ सेमी असावी, असे निकष आहेत. मात्र गेल्या काही महिन्यांत आम्ही रुळांची उंची वाढवल्याने प्लॅटफॉर्म आणि गाडी यांच्यातील उंची वाढली आहे, असे ते म्हणाले. मात्र याबाबत रेल्वे प्रवाशांनी गेली अनेक वर्षे वारंवार तक्रार करूनही मध्य किंवा पश्चिम यापैकी कोणत्याही रेल्वे प्रशासनाने त्याची गांभीर्याने दखल घेतलेली नाही. याबाबत डिव्हिजनल रेल्वे युजर्स कन्सल्टेटिव्ह कमिटीचे सदस्य अनिकेत घमंडी यांना विचारले असता, मध्य रेल्वेवरील प्लॅटफॉर्मची उंची हा गंभीर विषय आहे, असे ते म्हणाले. याबाबत वारंवार आवाज उठवूनही रेल्वे प्रशासनाने काहीच उपाययोजना केलेली नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. घाईच्या वेळी या उंचीमुळे आपला जीव धोक्यात असल्याची भीती आमच्या मनात नेहमीच असते, असे पश्चिम रेल्वेवरील काही महिला प्रवाशांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले. गेल्या आठवडय़ात ठाण्यातील सरकत्या जिन्यांच्या उद् घाटनासाठी रेल्वेतील वरिष्ठ अधिकारी ठाण्यात आले होते. त्यांना आम्ही प्लॅटफॉर्मची उंची वाढवण्याबद्दलचे निवेदन दिले. या निवेदनावर गंभीर विचार होऊन लवकरच ही उंची वाढवण्याच्या दृष्टीने प्रयत्न होतील, अशी अपेक्षा ठाण्यातील काही महिला प्रवाशांनी व्यक्त केली.