दहावीच्या परीक्षेत कमी गुण मिळाल्यामुळे आणि अनुत्तीर्ण झाल्यामुळे नैराश्य आलेल्या विद्यार्थ्यांना तसेच त्यांच्या पालकांना योग्य मार्गदर्शन मिळावे, म्हणून नाशिक विभागीय माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने ‘मदतवाहिनी’ सुरू केली आहे. ही मदतवाहिनी २३ जूनपर्यंत सुरू राहणार आहे.
दहावीच्या परीक्षेत पाल्याकडून पालकांची अधिक गुणांची अपेक्षा असते. त्यासाठी शाळेव्यतिरिक्त नियमितपणे शिकवणीवर खर्च केलेला असतो. विद्यार्थ्यांना सतत दहावीचे वर्ष शैक्षणिकदृष्टय़ा किती महत्त्वाचे असते याची जाणीव करून देण्यात येते. त्याचे नकळतपणे विद्यार्थ्यांवर दडपण येते. त्यामुळेच परीक्षेचा निकाल लागल्यावर पालकांच्या अपेक्षांची पूर्ती करू न शकणारे विद्यार्थी वेगळा मार्ग निवडण्याची शक्यता असते.
हे लक्षात घेऊन असे विद्यार्थी आणि पालकांचे समुपदेशन करण्यासाठी मंडळाने १७ जूनपासून ०२५३-२५९२१४३ ही मदतवाहिनी सुरू केली आहे. निकालात कमी गुण मिळालेल्या व अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना ताणतणावातून बाहेर पडण्यासाठी त्यांच्या समस्यांचे निरसन व्हावे, यासंबंधी विद्यार्थी व पालक यांना यथायोग्य मार्गदर्शन मिळावे म्हणून नाशिक विभागीय मंडळाने समुपदेशकांची नियुक्ती केली आहे.
या समुपदेशकांकडे समस्या मांडल्यास त्यांना योग्य मार्गदर्शन केले जाईल. समुपदेशकांची नावे व भ्रमणध्वनी क्रमांक पुढीलप्रमाणे- नाशिक जिल्हा- के. आर. बावा (९४२३१८४१४१), एस. व्ही. सोनवणे (९४२३४८२६४०), प्रशांत पाटील (९७६७३०३०९०), धुळे जिल्हा- एस. डी. पाटील (९४२१५३७३२३), नंदकिशोर बागूल (९४२०८५२५३१), जळगाव जिल्हा- किशोर राजे (९४२३१८५६७०), नीलेश साळुंके (९४२१५२११५६), प्रमोदिनी पाटील (९४०४५९४१८६). नंदुरबार जिल्हा- दिलीप पाटील (९४२३९८११४८), ए. बी. महाले (९४२१६१८१३०) यांचा समावेश आहे.