ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये अडचण येऊ नये, म्हणून त्यांच्या दैनंदिन गरजांसाठी पैसे लागल्यास विद्यार्थी सहायता निधीतून ते उभारता यावे, या दृष्टीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात आपत्कालीन विद्यार्थी सहायता निधी उभारण्यात आला आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी दुष्काळामुळे ‘उपासमार’ होत असल्याची कैफियत मांडली होती. या पाश्र्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला.
दरम्यान, या निर्णयामुळे राज्य सरकार विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी स्वतंत्र निधी देऊ शकत नाही काय, असा प्रश्न मात्र उपस्थित झाला आहे. दुष्काळासाठी निधी पडू दिला जाणार नाही, असे वारंवार सांगितले जाते. मात्र, सरकारी उपाययोजनांपेक्षा स्थानिक पातळीवरच निधी उभारण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे.
केवळ दुष्काळच नाही, तर अनेक वेळा विद्यार्थ्यांना अडचणी येतात. त्यामुळे अशा प्रकारचा निधी कायमस्वरूपी असावा, असा विचार कुलगुरू डॉ. विजय पांढरीपांडे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने केला. शुक्रवारी कुलगुरूंनी एक दिवसाचे पाच हजार रुपये वेतन या निधीत जमा केले. एकूण १६ हजार रुपये निधी दिवसभरात जमा झाला. विद्यापीठ परिसरातील महाराष्ट्र बँकेच्या शाखेत ६०१२३६७१३७१ या क्रमांकाच्या खात्यावर दानशूर व्यक्तींनी मदत द्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.