गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी वृद्ध, महिला व मुलांच्या मदतीसाठी सुरू केलेली हेल्पलाईन बंद पडलेली आहे. तिला तीन वर्षे उलटले तरी ती अद्यापही सुरू होऊ शकलेली नाही.  
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वृद्ध, महिला व मुलांच्या मदतीसाठी शहर पोलिसांची १०३ क्रमांकाची हेल्पलाईन २०११ मध्ये प्रजासत्ताक दिनाचा मुहूर्त साधून राज्याचे गृहमंत्री आर. आर. उपाख्य आबा पाटील यांच्या हस्ते सुरू झाली. आबांनी हा क्रमांक फिरवला. लगेच तो लागलाही. आबांनी शुभेच्छा देत काही सूचनाही केल्या. या क्रमांकावर नागरिकांना ‘क्वीक रिस्पॉन्स’ मिळायला हवा, याची जाणीव पोलिसांना करून द्यायला आबा विसरले नाहीत. त्यानंतर केवळ चार दिवसांनी हा क्रमांक बंद झाला होता. १०३ क्रमांक लावला असता ‘हा क्रमांक अस्तित्वात नाही’ असे वारंवार ऐकू येऊ लागल्याने नागरिक संतापले. एरवीही पोलिसांच्या नावे कायम बोटे मोडत असलेल्या नागरिकांना पुन्हा संधी मिळाली.
हा क्रमांक बंद झाल्याची बाब तत्कालीन पोलीस आयुक्तांनी बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांना सांगितली. १०३ हा विशेष क्रमांक असल्याने त्याची परवानगी मुख्य कार्यालयातून घ्यावी लागते. मुंबई व ठाण्यात हा क्रमांक सुरू असल्याचे निदर्शनास आणून दिले असता तेथे एमटीएनएल असून त्याचे मुख्य कार्यालय मुंबईतच आहे. त्यामुळे तेथे परवानगी लगेचच मिळाली. बीएसएनएलचे मुख्य कार्यालय दिल्लीत असून त्यांच्याकडून परवानगी मिळाली नसल्याचे उत्तर तेव्हा बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांनी दिल्याचे सूत्रांनी सांगितले.
पोलीस खात्याकडून १०३ या क्रमांकासाठी भाडे द्यायचीही तयारी दर्शवली गेली. निरंतर प्रयत्न करूनही १०३ क्रमांक पोलिसांना मिळालेला नाही. आजही हा क्रमांक फिरविल्यास तो अस्तित्वात नसल्याचे दूरध्वनीवर ऐकू येते.
वास्तविक १००, १०१, १०३, १०८ आदी क्रमांक नागरिकांच्या कायमचे स्मरणात राहणारे आहेत. कमी आकडे असल्याने ते लगेचच फिरविले जाऊ शकतात. १०३ क्रमांक मिळत नसल्याने अखेर पोलीस खात्याला आधीच मिळालेल्या दूरध्वनींपैकी एक दूरध्वनी वृद्धांच्या मदतीसाठी देण्यात आला आहे. या सर्व क्रमांकाची प्रसिद्धीची गरज निर्माण झाली आहे.
वर्तमान पोलीस आयुक्त कौशलकुमार पाठक यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली असता ‘यासंदर्भात माहिती घेऊन योग्य ती कार्यवाही केली जाईल’, असे ते म्हणाले.ू
केवळ धुळफेक?
गृहमंत्र्यांच्या हस्ते या क्रमांकाचे उद्घाटन केवळ धुळफेक होती काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. आर. आर. पाटील यांनी भविष्याची गरज लक्षात घेऊन जनसंपर्क विषय पोलिसांच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याची घोषणा केली होती. ती अद्यापही प्रत्यक्षात आलेली नाही. त्यांनीच त्यांच्या शुभ (?) हस्ते सुरू केलेली १०३ क्रमांकाची हेल्पलाईन चार दिवसात बंद होऊन तीन वर्षे उलटली तरी सुरू झालेली नाही. आबांच्या बाबतीतच नेमके असे का घडते, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
हेल्पलाईन
वृद्ध – २५६४३३३, महिला – १०९१, बालक – २५२०६९९, मनोरुग्ण विशेष झ्र् ९८२३०४८४८७