News Flash

तिच्या यशात साऱ्या समाजाला ऊर्जा

पाच बहिणी, एक भाऊ, अशिक्षित आई-वडील अन् घरचे दारिद्र्य अशा दुर्धर स्थितीत मुळाक्षरे गिरविणेही कठीण ठरावे. पण ‘शिकून मोठं व्हायचय’ हे एकच स्वप्न उराशी बाळगलेल्या

| January 22, 2013 10:19 am

पाच बहिणी, एक भाऊ, अशिक्षित आई-वडील अन् घरचे दारिद्र्य अशा दुर्धर स्थितीत मुळाक्षरे गिरविणेही कठीण ठरावे. पण ‘शिकून मोठं व्हायचय’ हे एकच स्वप्न उराशी बाळगलेल्या कोल्हापूरच्या धनश्री विलास तोडकर या विद्यार्थिनीने स्वप्नपूर्ती केली आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत धनश्री चार्टर्ड अकौटंटची कठीणतम परीक्षा उत्तीर्ण झाली आहे. या यशापासून प्रेरणा घेण्यासाठी मंगळवारी धनश्रीच्या झोपडीवजा घरात गरीब, गरजू विद्यार्थी व पालकांची रिघच लागली होती. अनेकांना स्वप्न पाहण्याची ऊर्जाच धनश्रीच्या यशात लपली असल्याचे जाणवत होते.
धनश्री तोडकर या युवतीचा यशाचा पट जितका रोचक तितकाच नजरेत अश्रू तरळायला लावणारा. कोल्हापुरातील कमला कॉलेजच्या बाजूला असलेल्या झोपडपट्टीमध्ये तिच्या आजीसमवेत वडील ४० वर्षांपूर्वी राहायला आले. आठवीपर्यंत शिक्षण झालेले वडील आणि सातवीपर्यंत शिकलेली आई यांचा गरिबीत संसार सुरू असताना एका पाठोपाठ एक सहा मुली जन्मल्या. त्यानंतर एक मुलगा. सुरुवातीची २० वर्षे नोकरी आणि पुढची तितकीच वर्षे चहाचा गाडा चालविणाऱ्या विलास तोडकर यांनी मुलींच्या शिक्षणाकडे जाणीवपूर्वक लक्ष दिले. दोन मुली शिक्षिका झाल्या. एक दवाखान्यात स्वागतिका अन् दोघी पदवीधर होऊन संसारात रमलेल्या.
धनश्रीने मात्र खूप शिकावे ही पालकांची इच्छा. १२ वीच्या वाणिज्य शाखेत शिकत असताना तिने ती पूर्ण केली. २००४ मध्ये गुणवत्ता यादीत ती १७ वी आली. त्याच दिवशी आताचे गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांनी तिची भेट घेऊन शिक्षणाचा सर्व खर्च पूर्ण करण्याचा शब्द दिला. आज ती सी. ए. झाली असताना त्यांचा शब्दही खरा ठरला. १२ वी नंतर धनश्रीने सी.ए.व्हायचे ठरविले. कोल्हापुरातील आर. बी. भागवत अँड कंपनी या चार्टर्ड अकौटंट कंपनीत ती शिकत होती. तेथे नोकरी असलेली दीपाली गोरे व नीलेश भालकर यांनी शिकण्यासाठी तिला मदत केली. शिकवणीसाठी जाणाऱ्या प्रा. श्रीमती घेवारी यांनी तिचे मनोधैर्य वाढविले. थोरली बहीण उमा जाधव हिने तिच्यात आत्मविश्वास निर्माण केला.
घरच्या गरिबीमुळे अनेकदा तिला शिक्षण थांबवून नोकरी करण्याची इच्छा होत असे. सी. ए. करताना अॅग्रीगेट सादर करताना तो विषय राहिला की तिला खूपच वाईट वाटायचे. एक विषय राहिल्यामुळे सगळ्या विषयांची परीक्षा पुन्हा देताना नव्याने अभ्यासाचे कष्ट उपसावे लागत असे. मुळातच अभ्यासासाठी घरी जागा नसायची. वडिलांचा चहाचा गाडा असलेल्या डॉ. निगडे हॉस्पिटलमध्ये अभ्यासासाठी जागा उपलब्ध झाली. तिचा पुरेपूर वापर करीत ती सी. ए. चा कठीण असणारा अभ्यास तेथे पूर्ण करीत राहिली.
अतिक्रमण निर्मूलन मोहिमेत वडिलांचा चहाचा गाडा हटविला गेला तेव्हा आई घरातून चहा हॉस्पिटलमध्ये नेऊन रुग्णांना पोहचवत असे. अभ्यासातून वेळ काढून धनश्री आईच्या मदतीसाठी उभी राहात असे. येणाऱ्या प्रत्येक अडचणीवर मात करीत ती पुढे शिकत राहिली आणि आज सी.ए.होऊन आयुष्याच्या यशाचे गणित सोडविण्यात ती यशस्वी ठरली आहे. थोडे दिवस नोकरी केल्यानंतर सीसा, डीसा यासारखे उच्च शिक्षण घेऊन सुस्थिर होण्याचे स्वप्न आता तिच्या डोळ्यामध्ये चमकत आहे. प्रतिकूल परिस्थितीत चार्टर्ड अकौटंटची परीक्षा धनश्री पास झाल्याचे समजल्यावर तिचे कौतुक करण्यासाठी अनेकांनी तिचे घर गाठले. विशेषत गरीब परिस्थितीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी धनश्रीशी मनमोकळा संवाद साधला. अनेकांना भावनावेग न आवरल्याने अश्रू रोखणे कठीण बनले होते, पण याचवेळी या विद्यार्थ्यांच्या खचलेल्या मनात प्रेरणेची ऊर्जा भरण्याचे काम धनश्रीच्या यशाने केले होते.
 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 22, 2013 10:19 am

Web Title: her success empowered the society
Next Stories
1 ऊस गाळपावरून चंदगडमध्ये वाद
2 वृध्द दाम्पत्याच्या बेकायदा अटकेप्रकरणी सरकारला सहा लाख भरपाईचा आदेश
3 गुंगीचे औषध देऊन रेल्वेत तरुणीला लुटले
Just Now!
X