दिंडोरीच्या लखमापूर शिवारातील हेक्झागॉन व्हायटो केमिकल कारखान्याच्या जागेतून आसपासच्या शेतकऱ्यांनी टाकलेल्या जलवाहिन्या वारंवार विनंती करूनही काढल्या जात नसल्याची तक्रार व्यवस्थापनाने केली आहे. या जलवाहिन्या काढण्याऐवजी कारखाना पाण्याची चोरी करते असा बनाव रचुन नुकसान भरपाईच्या नावाखाली मोठी रक्कम उकळण्याचा प्रयत्न होत आहे. उघडय़ावरून जाणाऱ्या जलवाहिन्या तातडीने काढून टाकण्याची मागणी कारखान्याने केली आहे.
या बाबतची माहिती व्यवस्थापक राहूल गेडाम यांनी पत्रकार परिषदेत दिली. लखमापूर शिवारात गट क्रमांक ४४७ या जागेवरील कारखान्यात अन्नधान्याशी संबंधित उत्पादन घेतले जाते. शिवारातील काही शेतकऱ्यांनी ओझरखेड बंधाऱ्यातून पंपद्वारे वाहिनीद्वारे पाणी उचलले आहे. संबंधितांनी त्याबाबत परवानगी घेतली की नाही याचा विचार कारखान्याने कधी केला नाही. कारखाना आणि संरक्षक भिंतीचे काम सुरू करताना या जागेतून जलवाहिनी काढून घेण्याची विनंती केली होती. कारखान्याच्या जागेतून जलवाहिन्या न्यायच्या असल्यास चर खोदून त्या न्याव्यात असे सांगण्यात आले. तथापि, उघडय़ावर राहिल्याने काय नुकसान होते, चर खोदून जलवाहिन्या टाकल्यास खर्च येईल अशा सबबी शेतकऱ्यांकडून सांगण्यात आल्या. कारखान्याची प्रयोगशाळा आणि रासायनिक प्रक्रिया लक्षात घेता जलवाहिन्या फुटल्यास प्रयोगशाळेचे नुकसान होऊ शकते. या स्थितीत काही शेतकऱ्यांनी जलवाहिनीची गळती झाल्याचे सांगून कारखान्यातील कर्मचाऱ्यांना त्रास दिला जात आहे. कारखाना कसा चालविता, अशी धमकी संबंधितांकडून देण्यात आल्याचे गेडाम यांनी नमूद केले.
कारखान्यात पाणी लागेल असे उत्पादन घेतले जात नाही. आपल्या जागेत कारखान्याच्या पाच ते सहा कुपनलिका आहेत. आसपासच्या भागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नळ जोडणी देऊन करण्यात आली आहे. या स्थितीत कारखाना संबंधितांच्या पाण्याची चोरी का करेल असा प्रश्न व्यवस्थापनाने उपस्थित केला.
खोटे आरोप करून पाणी नेणारे शेतकरी भरपाईच्या नावाखाली पैसे उकळण्याचा प्रयत्न करत आहेत. वारंवार विनंती करूनही अद्याप शेतकऱ्यांनी जलवाहिनी जमिनीखालून नेण्यास टाळाटाळ केली आहे. यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव उघडय़ा जलवाहिन्या काढून टाकणे आवश्यक झाले असून संबंधितांना तसे निर्देश द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.