डोंबिवली पश्चिम भागात मंगळवारी रात्री नऊ वाजल्यापासून पहाटे सहा वाजेपर्यंत आठ ते नऊ वेळा वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडले.वीजप्रवाह नसल्याने घरातील पंखे, रस्त्यावरील दिवे बंद झाले होते. देवीचापाडा येथील महावितरणचा नियंत्रण कक्षातील दूरध्वनी सतत व्यस्त येत होता. वीजप्रवाह खंडित झाल्यानंतर दोन तासांनी पुन्हा तो सुरू होत होता. पुन्हा खंडित होत होता. पहाटे सहा वाजेपर्यंत हा लपंडाव सुरू होता. वीज वाहिनीतील बिघाडामुळे हा प्रकार घडत असल्याचे महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले. गेल्याच आठवडय़ात उर्सेकरवाडीतील वीजप्रवाह खंडित झाल्याने डोंबिवली पूर्वमधील अनेक भाग अंधारात होते. महावितरणकडून तांत्रिक बिघाडाच्या नावाखाली हे अघोषित भारनियमन सुरू असल्याची टीका नागरिकांकडून करण्यात येत आहे.