मराठी भाषेचे मनन आणि चिंतन सध्या सर्वत्र सुरूआहे. मात्र आत्ताची पिढीची मराठी भाषेशी असलेली नाळ तुटत चालली असून यात समाजातील वरच्या स्तराचे तर मराठीशी नातेच तुटले असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ कवी अशोक नायगांवकर यांनी वाशी येथील एका कार्यक्रमात केले.
मराठी साहित्य, सांस्कृतिक, कला मंडळाच्या वतीने कवी शंकर पंडित यांच्या शेला ढगांचा, या काव्यसंग्रहाचे व सल आणि जोगिनी या कादंबरीचे प्रकाशन नायगांवकर यांच्या हस्ते  झाले.
या वेळी कवी साहेबराव ठाणगे उपस्थित होते. जोगिनी या कादंबरीद्वारे देवदासी प्रथेवर प्रकाश टाकण्यात आला आहे.
भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांत काही महिने वास्तव करणारे सृजनशील कवी, लेखक शंकर पंडित यांच्या अनेक काव्यसंग्रह व कादंबरीचे प्रकाशन यापूर्वी झाले आहे. त्यांनी ‘दासबोध’चे केलेले इंग्रजी रूपांतर देशात चांगलेच लोकप्रिय झालेले आहे. त्यांच्या या नव्वदीतील हुन्नरीपणाला सलाम करताना नायगांवकर यांनी त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली. अमेरिकेत राहून मराठीची नाळ टिकवून ठेवल्याबद्दल पंडित यांचे आभार मानले. निवृत्तीनंतर काय करावे, असा प्रश्न पडणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना राजाभाऊंनी चांगला आदर्श घालून दिल्याचे त्यांनी सांगितले.