News Flash

ग्रामीण भागात उत्साह, शहरात निरुत्साह

मतदान यंत्र व ‘व्हीव्ही पॅट’ यंत्रातील बिघाडामुळे काही ठिकाणी रखडलेले मतदान.. सकाळपासून सुशिक्षित भागात मतदारांच्या लागलेल्या रांगा.. दुसरीकडे झोपडपड्डी व अल्पसंख्याक भागातील केंद्रांत मतदारांची प्रतीक्षा

| October 16, 2014 02:07 am

मतदान यंत्र व ‘व्हीव्ही पॅट’ यंत्रातील बिघाडामुळे काही ठिकाणी रखडलेले मतदान.. सकाळपासून सुशिक्षित भागात मतदारांच्या लागलेल्या रांगा.. दुसरीकडे झोपडपड्डी व अल्पसंख्याक भागातील केंद्रांत मतदारांची प्रतीक्षा करणारे कर्मचारी.. संवेदनशील केंद्राबाहेर रायफलधारी जवानांचा कडेकोट बंदोबस्त.. वाद-विवादाच्या काही घटना.. इगतपुरी व त्र्यंबकेश्वर तालुक्यांत दोन गावांनी टाकलेला बहिष्कार.. ग्रामीण भागात उत्स्फूर्तता तर शहरी भागात उदासिनता.. आपल्या हक्काचे मतदान करवून घेण्यासाठी उमेदवार व कार्यकर्त्यांची चाललेली धावपळ.. नवमतदारांच्या बरोबरीने ज्येष्ठ व वयोवृद्धांपर्यंतच्या मंडळींनी मतदानास दिलेला अग्रक्रम.. मतदानाची घटिका संपुष्टात येण्याच्या मार्गावर असताना अचानक वाढलेली गर्दी..
जिल्ह्यातील १५ विधानसभा मतदारसंघांत बुधवारी मतदानानावेळी हे चित्र पाहावयास मिळाले. दुपारी तीन वाजेपर्यंत जिल्ह्यात ४३.९० टक्के मतदानाची नोंद झाली. पुढील तीन तासांत त्यात लक्षणीय वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात आली. १७३ उमेदवार रिंगणात असलेल्या या निवडणुकीत काही किरकोळ घटनांचा अपवाद वगळता मतदान शांततेत पार पडले. जिल्ह्यातील ४२०८ मतदान केंद्रांवर सकाळी सात वाजता कडेकोट पोलीस बंदोबस्तात मतदानाला सुरुवात झाली. बहुतांश उमेदवारांचा पहिल्या सत्रात स्वत:सह कुटुंबीयांचे मतदान करण्याकडे कल होता. त्यानंतर वेगवेगळ्या मतदान केंद्रांबाहेर मतदारांना अभिवादन करण्यासाठी ते रवाना झाले. मतदान प्रक्रियेत अडसर येऊ नये म्हणून यंत्रणेने पुरेशी खबरदारी घेतली. परंतु, जेव्हा प्रत्यक्ष मतदान सुरू झाले, तेव्हा मतदान यंत्र व व्हीव्ही पॅट यंत्रांनी दोष दाखविणे सुरू केले. अनेक केंद्रांवर मतदान यंत्रात अडचणी उद्भवल्या. त्यामुळे काही ठिकाणी मतदान प्रक्रिया थांबवावी लागली. मतदारांना दीड ते दोन तास तिष्ठत बसावे लागले. काही केंद्रांवर व्हीव्ही पॅट यंत्रात दोष उद्भवले. सकाळच्या सत्रात यंत्रातील बिघाडाच्या अनेक घटना घडल्या. हे दोष दूर केल्यानंतर उपरोक्त ठिकाणी मतदान सुरळीत सुरू झाले. मतदानावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून शहर व ग्रामीण पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केला होता. संवेदनशील केंद्रांबाहेर केंद्रीय राखीव दलाचे रायफलधारी जवान तैनात करण्यात आले. केंद्राच्या २०० मीटरच्या परिघात कोणालाही वाहने घेऊन येण्यास मज्जाव करण्यात आला. यामुळे अनेक वाहनधारकांचे पोलीस यंत्रणेशी वाद झाले.
सकाळी गंगापूर रोड व कॉलेज रोड परिसरातील वाघ गुरुजी शाळा, बीवायके महाविद्यालय, हिंदी माध्यमिक विद्यालय, केबीएच स्कूल, मराठा हायस्कूल या ठिकाणी मतदारांच्या अक्षरश: रांगा लागल्या होत्या. दुसरीकडे बी. डी. भालेकर हायस्कूल व मध्य नाशिकमधील अनेक केंद्रांवर तुरळक मतदार दिसत होते. परंतु, दुपार होऊ लागली तसतसे अल्पसंख्याक व झोपडपट्टी परिसरातील केंद्रांवर मतदारांची गर्दी होऊ लागली. मतदानाची वेळ संपण्याच्या एक तास अगोदर तर या ठिकाणी मतदारांच्या रांगा लागल्या. लोकसभेप्रमाणे मतदानाची टक्केवारी वाढणार की नाही याकडे सर्वाचे लक्ष होते. उमेदवार व कार्यकर्त्यांनी मतदानाची वेळ संपुष्टात येईपर्यंत आपल्या हक्काचे मतदान कसे होईल याकडे लक्ष केंद्रित केले. काही उमेदवारांनी मतदारांसाठी खास वाहन व्यवस्थाही केली होती. ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरी भागात मतदारांमध्ये कमालीचा निरुत्साह होता. दुपारी तीन वाजेपर्यंत शहरातील चारही मतदारसंघांत सर्वात कमी मतदान झाले होते. नाशिक पूर्वमध्ये ३२.२८ टक्के, नाशिक मध्य ३२.९६ टक्के, नाशिक पश्चिम ३९.१७ टक्के अशी ही आकडेवारी होती. त्याउलट ग्रामीण भागात मतदारांमध्ये उत्साह पाहावयास मिळाला. दुपापर्यंत जिल्ह्यात सर्वाधिक ६१.६५ टक्के मतदान दिंडोरी मतदारसंघात नोंदविले गेले. नांदगावमध्ये ४०.४६, मालेगाव मध्य ५३.६२, मालेगाव बाह्य ४५.३, बागलाण ४२.८६, कळवण ४४.३३, चांदवड २८.०३, येवला ४३.२०, सिन्नर ५४.५, निफाड ५२.९४, इगतपुरी ३६.८८ टक्के मतदानाची नोंद झाल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

‘बीएलओं’ची खास व्यवस्था
लोकसभा निवडणुकीत मतदार चिठ्ठी वितरित करताना केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना (बीएलओ) वाऱ्यावर सोडण्यात आले होते. केंद्रांवर बीएलओ न सापडल्यामुळे अनेकांना मतदानापासून वंचित राहावे लागले. विधानसभा निवडणुकीत हा गोंधळ होऊ नये याची यंत्रणेने दक्षता घेतली. मतदान केंद्राबाहेर बीएलओंसाठी खास आसन व्यवस्था करण्यात आली. उन्हाची झळ त्यांना बसणार नाही याची काळजी घेताना पाणी व तत्सम बाबींची पूर्तता केली गेली. बीएलओंची खास बडदास्त ठेवल्यामुळे मतदारांनाही नाव शोधण्यासाठी फारशी धावपळ करावी लागली नाही. लोकसभेप्रमाणे मतदार यादीत गोंधळ झाला नाही. लोकसभेतील मतदार चिठ्ठी अनेकांनी जपून ठेवली होती. ही चिठ्ठी दाखवून त्यांनी विधानसभा निवडणुकीची चिठ्ठी घेतली. यामुळे मतदानावेळी नावे शोधताना फारसा गोंधळ झाला नाही.

गवांडे व पहिणे गावांचा बहिष्कार
शासनामार्फत नागरी सुविधा पुरविल्या जात नसल्याच्या निषेधार्थ इगतपुरी तालुक्यातील गवांडे तर त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पहिणे या दोन गावांनी मतदानावर बहिष्कार टाकला. रस्त्याचे काम झाले नाही आणि गावापर्यंत वीज पोहोचली नाही अशी तक्रार गवांडेच्या ग्रामस्थांनी केली. गावातील एकही मतदार मतदानासाठी आला नाही. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील गवांडे गावातील केंद्रात दोन मतदारांनी मतदान केल्यावर ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. दोन जणांनी मतदान केले असल्याने बहिष्कार टाकला नसल्याचा दावा यंत्रणेने केला. गावातील पिण्याच्या पाण्याची समस्या सोडविली जात नसल्याने ग्रामस्थांनी हा पवित्रा स्वीकारल्याचे सांगण्यात आले. गावात एकूण ६९३ मतदार असून त्यातील केवळ दोन जणांनी मतदान केले.

महिला पोलीस अधिकाऱ्यास धक्काबुक्की
मतदान केंद्राच्या २०० मीटरच्या परिघात वाहन आणल्यावरून हटकताना झालेल्या वादविवादातून एका महिला ज्युदोपटूने महिला पोलीस उपनिरीक्षकास धुक्काबुक्की करण्याची घटना घडली. गंगापूर रस्त्यावरील वाघ गुरुजी शाळेतील मतदान केंद्राबाहेर बुधवारी दुपारी हा प्रकार घडला. ज्युदोपटू रुपाली अंजने व त्यांचा पती दीपक अंजने हे दुचाकीवरून मतदानासाठी आले होते. या वेळी संबंधितांनी आपली दुचाकी २०० मीटरच्या आतमध्ये उभी केली. ही बाब लक्षात आल्यावर पोलीस उपनिरीक्षक सरिता जाधव यांनी दुचाकी काढण्यास सांगितले. या वेळी महिला पोलीस अधिकाऱ्याने अंजने यांना काठी मारून हटकल्याचे सांगितले जाते. यामुळे संतप्त झालेल्या अंजने यांनी पोलीस अधिकाऱ्यास धक्काबुक्की केली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम गंगापूर पोलीस ठाण्यात सुरू होते.

‘व्हीव्ही पॅट’मुळे शंका निरसन
नाशिक मध्य, नाशिक पश्चिम आणि नाशिक पूर्व या शहरातील तीन मतदारसंघांत प्रथमच ‘व्हीव्ही पॅट’ यंत्रणेचा वापर करण्यात आला. या यंत्रामुळे मतदाराने केलेले मतदान यंत्रात योग्य पद्धतीने नोंदविले गेले की नाही याची माहिती मतदारांना मतदान केल्याक्षणी समजली. आपण कोणत्या उमेदवारास मतदान केले हे चिठ्ठीद्वारे दिसण्याची व्यवस्था या यंत्राद्वारे प्रत्यक्षात आली. या यंत्रामुळे मतदान भलत्याच उमेदवाराला गेल्याच्या घेतल्या जाणाऱ्या आक्षेपास चाप बसला. तथापि, या यंत्राच्या कामगिरीची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यास निवडणूक यंत्रणा कमी पडली. अनेक ज्येष्ठ मतदारांना त्याची माहिती नव्हती. मतदान यंत्रावरील कळ दाबल्यानंतर या यंत्रात आपण कोणाला मतदान केले हे समजणार होते. पण, ही बाब ज्ञात नसल्याने त्यांनी मतदान झाल्यावर व्हीव्ही पॅटकडे न पाहता बाहेर पडले.

२३ हून अधिक मतदान यंत्रांत बिघाड
जिल्ह्यतील १५ मतदारसंघांत मतदान प्रक्रिया सुरू झाल्यानंतर २३ हून अधिक मतदान यंत्रात बिघाड झाल्याचे निदर्शनास आले. तर काही ठिकाणी व्हीव्ही पॅट यंत्रातही दोष उद्भवले. या कारणास्तव अनेक केंद्रांवरील मतदान प्रक्रिया एक ते दोन तास बंद होती. नाशिक पश्चिम मतदारसंघात सर्वाधिक १३ केंद्रांवर यंत्रात अडचणी आल्या. दिंडोरीत माळुंगे केंद्रातील यंत्रात मतदान सुरू होण्याआधीच बिघाड झाला.सुरगाणा तालुक्यात बिघाड झालेली दोन यंत्रे बदलावी लागली. आपण केलेले मतदानाची योग्य नोंद झाली की नाही याची स्पष्टता होण्यासाठी बसविलेल्या व्हीव्ही पॅट यंत्रातही बिघाड झाले. पण, मतदान यंत्राच्या तुलनेत त्याचे प्रमाण कमी होते. नाशिक मध्य मतदारसंघातील रवींद्र कोठारी व बी. डी. भालेकर हायस्कूल या दोन केंद्रांवरील ‘व्हीव्ही पॅट’ यंत्र बंद पडले. ही बाब लक्षात आल्यावर तातडीने ते बदलण्यात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 16, 2014 2:07 am

Web Title: high voter turnout in rural but urban areas show sharp decline in nashik district
Next Stories
1 ‘लक्ष्मी दर्शन’ झाले, भरारी पथकांनी पाहिले नाही
2 नवमतदारांनी व्यक्त केल्या भावना ; कोणाला पक्ष महत्वाचा, तर कोणाला व्यक्ती
3 धुळ्यात मतदारांमध्ये उत्साह
Just Now!
X