उरण विधानसभा मतदारसंघातील मतदानाला सुरुवात झाल्यानंतर मतदान केंद्रावर तुरळकच गर्दी होती. मतदानासाठी स्लिपा देणाऱ्या कार्यकर्त्यांची ठिकठिकाणी अधिक गर्दी होती, मात्र त्या मानाने मतदार मतदानासाठी बाहेर पडत नव्हते. उरणमधील शहरी भागात तीन तासांत अवघे तीन टक्के मतदान झालेले होते. ग्रामीण भागात १५ ते २० टक्के मतदान झाले होते. मतदानाला ग्रामीण भागात दुपारी १२ नंतर वेग आला असून अनेक गावांत तान वाजेपर्यंत ७० टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झालेले होते. दुपारी तीन वाजेपर्यंत उरण विधानसभा मतदारसंघात ४४.२७ टक्के इतके मतदान झाल्याची नोंद करण्यात आलेली होती. मतदानाला सकाळी सात वाजता सुरुवात झाल्यानंतर उरण विधानसभा मतदारसंघातील आठ मतदान केंद्रांतील ईव्हीएम मशिनमध्ये तांत्रिक बिघाड असल्याने त्यांपैकी सहा मशीन बदलून मतदान वेळेत सुरू करण्यात आल्या तर दोन मशीन पुन्हा सुरू झाल्याची माहिती साहाय्यक निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली. उरण विधानसभा मतदारसंघातील मतदान शांततेत व्हावे याकरिता उरणमध्ये पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता. अनेक ठिकाणी चेक नाके तयार करून वाहने तपासली जात होती. यामध्ये प्रामुख्याने प्रेस लिहलेल्या वाहनांची आवर्जून तपासणी केली जात होती. बंदोबस्ताची पाहणी करण्यासाठी पोलीस आयुक्त के. एल. प्रसाद यांनी उरण परिसराला भेट दिली होती. मतदारांची ने-आण करण्यासाठी अनेक पक्षांनी वाहनांचीही व्यवस्था केली होती.