सुस्त रेल्वे प्रशासन, संत्रस्त नागरिक
सुखकर प्रवासाचे  स्वप्न मेट्रो आणि सरकत्या जिन्यांच्या सोयींनी लवकरच पूर्ण करण्याचे आश्वासन रेल्वे प्रशासनाने दिले असले तरीही ठाणे तसेच रायगड जिल्ह्य़ातील शहरे व गावांमधून नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने दररोज मुंबईत ये-जा करण्याऱ्या लाखो प्रवाशांच्या समस्या मात्र कायम आहेत. मुंबई-ठाण्यात घरांच्या किंमती परवडत नसल्याने कनिष्ठ मध्यमवर्गीयांनी टिटवाळा, खडवली, आसनगांव तसेच वांगणी, नेरळ येथे स्वस्त घरांचा पर्याय निवडण्यास सुरुवात केली आहे. त्यातच कर्जत-भिवपुरी परिसरात अनेक अभियांत्रिकी महाविद्यालये सुरू झाली असून मुंबई, नवी मुंबई तसेच ठाणे परिसरातून दररोज येथे विद्यार्थी ये-जा करू लागले आहेत. शिवाय अंबरनाथ-बदलापूर औद्योगिक विभाग दिवसेंदिवस वाढत आहेत. अंबरनाथ येथील आनंदनगर एमआयडीसी विभाग तर राज्यातील तिसरा मोठा औद्योगिक विभाग आहे. महेंद्र अ‍ॅण्ड महेंद्र, गोदरेज, सीएट तसेच अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या येथे येत आहेत. त्यामुळे ‘अप’प्रमाणे ‘डाऊन’ मार्गावरील प्रवाशांची गर्दीही लक्षणीयरित्या वाढली आहे. परिणामी केवळ ‘पीकअवर’च नव्हे तर या मार्गावर सध्या सगळ्याच लोकलना गर्दी असते. याचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे अजूनही या भागातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना रेल्वेशिवाय वाहतुकीचे कोणतेही साधन नाही. रेल्वे बंद असेल तर कर्जतची व्यक्ती मुंबई सोडा, बदलापूर अथवा अंबरनाथलाही येऊ शकत नाही. शिवाय सध्या कर्जत मार्गावरील सर्व गाडय़ा जलद आहेत. कर्जतहून सुटलेली जलद लोकल बदलापूरलाच ‘फुल्ल’ होते. त्यामुळे कर्जतहून अंबरनाथला येऊ इच्छिणाऱ्या प्रवाशांना उतरताना बरीच कसरत करावी लागते. तसेच अंबरनाथ-बदलापूरहून सकाळी काही कामानिमित्त डोंबिवलीला जाऊ इच्छिणाऱ्यांचीही पंचाईत होते. कारण सध्याच्या वेळापत्रकात रेल्वे प्रशासनाने या लहान अंतरावरील प्रवाशांना गृहीतच धरलेले नाही. बदलापूर-अंबरनाथ थेट रस्ता असला तरी दोन्ही शहरांना जोडणारी बस वाहतूक नाही. दुसरीकडे कल्याण-डोंबिवलीत महापालिकेची परिवहन सेवा असली तरी या दोन्ही शहरांना थेट जोडणारा रस्ता अद्याप होऊ शकलेला नाही. परिणामी काही कारणाने रेल्वे वाहतूक ठप्प झाली की ठाणे तसेच रायगड जिल्ह्य़ातील कल्याण पल्याडच्या या शहरांची अवस्था एखाद्या बेटांसारखी होते.

  * शटल सेवेमुळे  दिलासा मिळू शकतो
मध्य रेल्वेवरील उपनगरी गाडय़ांचा प्रवास सुखकर होण्यासाठी कल्याण अथवा ठाण्याहून कसारा/कर्जत मार्गावर ठरावीक अंतराने शटल सेवा सुरू करावी, अशी मागणी या भागातील प्रवासी गेली अनेक वर्षे करीत आहेत. अखेर चार वर्षांपूर्वी रेल्वे प्रशासनाला ‘शटल’चे महत्त्व पटले. तीन वर्षांपूवी रेल्वे अर्थसंकल्पात ठाणे-कर्जत/कसारा मार्गावर शटल स्वरूपाच्या ३२ फेऱ्या सुरू करण्याची घोषणा झाली. मात्र तांत्रिक मर्यादांमुळे त्यापैकी काही मोजक्याच फेऱ्या सुरू होऊ शकल्या. आता मात्र या सेवेसाठी रेल्वे प्रशासन सज्ज झाले असून फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्यात टप्प्याटप्प्याने ठाणे-कर्जत/कसारा मार्गावर २२ नव्या फेऱ्या सुरू करण्यात येणार आहेत. सध्या या मार्गावर सरासरी एक तासाला गाडी आहे. नव्या फेऱ्यांमुळे सरासरी चाळीस मिनिटांनी गाडी उपलब्ध होऊ शकेल, अशी माहिती रेल्वे प्रवासी संघटनेचे मनोहर शेलार यांनी दिली. उशिराने का होईना उपनगरी रेल्वे प्रवाशांच्या मागण्यांची पूर्तता होत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.