कविता, वाक्प्रचार, शायरी, नाटिका, काव्य संमेलन अशा वेगवेगळ्या उपक्रमांद्वारे जिल्ह्यातील विविध शाळा, महाविद्यालयांमध्ये हिंदी दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
जी. डी. सावंत महाविद्यालय
गोदावरी शिक्षण मंडळ संचालित जी. डी. सावंत आर्ट्स, कॉमर्स, सायन्स अ‍ॅण्ड बीसीएस महाविद्यालयात हिंदी दिनानिमित्त काव्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. ‘कविता लव की’ या विषयावर स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. प्राचार्य डॉ. ए. डी. बांदल अध्यक्षस्थानी होते. संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी टी. आय. पठाण, हिंदी विभाग प्रमुख उज्ज्वला अहिरे यावेळी उपस्थित होते. प्रा. अहिरे यांनी जागतिक पातळीवर एका बाजूला इंग्रजी भाषेचे महत्त्व वाढत असून दुसऱ्या बाजूला इतर भाषेच्या अस्तित्वाचा प्रश्न ही एक ज्वलंत समस्या बनत असल्याचे सांगितले. त्याचा समन्वय केवळ विद्यार्थीच शिक्षणाच्या माध्यमातून करू शकतात असे मत त्यांनी व्यक्त केले. काव्यवाचन स्पर्धेत स्वरचित आणि संकलित अशा दोन प्रकारच्या प्रेमावरील कविता विद्यार्थ्यांनी सादर केल्या. स्पर्धेत शिखा श्रीवास्तव, रवींद्र भोर, पूजा पीठे, तनवीर शेख, मराठी भाषेत स्वयंरचित कवितेत विनोद इंगोले, निशा जाधव, तेजस नकीले, रवींद्र ठाकरे विजेते ठरले. प्राचार्य डॉ. बांदल यांनी राष्ट्र भाषेचे जतन करण्याचे आवाहन केले. शिखा श्रीवास्तव हिने सूत्रसंचालन केले, तर राकेश पगारे यांनी आभार मानले.
पाटविहीर जिल्हा परिषद शाळा
कळवण तालुक्यातील पाटविहीर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत हिंदी दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी कुंदन दाणी होते. नीलेश भामरे यांनी हिंदी राष्ट्रभाषेचा प्रचार व प्रसार विद्यार्थ्यांनी करावा असे आवाहन केले. यावेळी हिंदीतील कविता, मुहावरे, कहावते, शायरी, कथा, नाटिका याचे सादरीकरण केले. मुख्याध्यापक जिभाऊ निकम यांनी हिंदी राष्ट्रभाषा असून भारतातील जनतेशी संपर्क साधण्यासाठी ती उपयुक्त असल्याचे सांगितले. ‘जीवन मे मॉं का स्थान’ या विषयावर वंदना सपकाळे यांनी मनोगत व्यक्त केले.