जिल्हा परिषदेच्या विकासकामांच्या निमित्ताने अध्यक्ष मीनाक्षी बोंढारे यांनी उद्या (मंगळवारी) विशेष सभेचे आयोजन केले आहे. स्थानिक स्तरावर सिंचन विभागाला जि.प.चा गेलेला दोन कोटींचा निधी व स्मशानभूमीच्या कामासाठी प्राप्त दीड कोटी खर्चाचे अद्याप नियोजन झाले नाही. या मुद्यावर उद्याच्या सभेत विरोधक प्रशासनाला धारेवर धरणार, असे चित्र आहे.
जिल्हा परिषद अंतर्गत मागासक्षेत्र विकास निधी, दलितवस्ती सुधार निधी वाटपाच्या यादीस पालकमंत्री वर्षां गायकवाड यांनी दिलेल्या स्थगितीवरून सत्ताधारी व विरोधकांत आरोप-प्रत्यारोप सुरू झाल्याने वादाला तोंड फुटले आहे. विरोधी सदस्य विनायक देशमुख, संजय दराडे, गजानन देशमुख यांच्याशी संपर्क साधला असता, शिक्षकांच्या बदल्यांमध्ये अनियमितता, मागासक्षेत्र विकासनिधी वाटपासाठी गावाची तीन वेळा केलेली निवड या बाबत प्रशासनाला जाब विचारला जाणार असल्याचे दराडे यांनी स्पष्ट केले. दहन व दफनभूमीसाठी सुमारे दीड कोटी निधी प्राप्त झाला. मात्र, खर्चाचा नियोजन आराखडा जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सादर न केल्याने खर्चास मंजुरी मिळाली तर नाहीच, अजून खर्चाचे नियोजन नसल्याने हा निधी परतीच्या वाटेवर असल्याचे विरोधकांनी सांगितले. दोन कोटींचा अखर्चित निधी आता स्थानिकस्तर लघुसिंचन विभागाकडे वर्ग केला आहे. विकासकामाचे नियोजन नसल्याने अखर्चित निधीचा जाब उद्या सभेत सत्ताधाऱ्यांना विचारला जाणार असल्याने ही सभा गाजणार असल्याचे चित्र आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 22, 2013 12:57 pm