जानेवारी महिन्यात भाजपमध्ये प्रवेश करण्याचा मुहूर्त ऐनवेळी हुकला तरी या पक्षाशी सलगी कायम ठेवणारे जनराज्य आघाडीचे संस्थापक शिक्षक आमदार डॉ. अपूर्व आणि जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष अद्वय या हिरे बंधूंनी गुरुवारी मुंबईत गाजावाजा न करता भाजपमध्ये प्रवेश केला. पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीच्या संमेलनाच्या वेळी वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या प्रवेश सोहळ्यात जनराज्य आघाडी भाजपमध्ये विलीन करण्याची घोषणाही हिरे बंधूंनी केली.
माजी मंत्री प्रशांत हिरे यांचे पुत्र असलेले डॉ. अपूर्व व अद्वय हे काही वर्षांपूर्वी राष्ट्रवादीतून काँग्रेसमध्ये दाखल झाले होते. मात्र घुसमट होत असल्याची तक्रार करत त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. त्यानंतर जनराज्य आघाडीची स्थापना करून त्यांनी काही काळ राजकारण सुरू केले. दरम्यानच्या काळात डॉ. अपूर्व हे आधी नाशिक महापालिकेत नगरसेवक व नंतर नाशिक विभागाच्या शिक्षक मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले. तर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीसाठी धुळे मतदारसंघातून भाजपच्या उमेदवारीसाठी अद्वय हिरे यांनी जोरकसपणे प्रयत्न केले होते. त्या अनुषंगाने पक्षाच्या काही वरिष्ठांनी उमेदवारीचा शब्द देत गेल्या जानेवारी महिन्यात हिरे बंधूंच्या भाजप प्रवेशाचा मुहूर्त नक्की केला होता. या प्रवेशाच्या संदर्भात तेव्हा मोठा गाजावाजा करण्यात आला होता आणि हा प्रवेश सोहळा दणक्यात व्हावा म्हणून जय्यत तयारीदेखील करण्यात आली होती. मात्र अगदीच ऐनवेळी हा प्रवेश सोहळा तेव्हा रद्द केला गेला. पक्षाच्या एका गटाने अपशकून केल्याने हा प्रवेश रद्द केल्याचे त्यावेळी सांगितले गेले.
हा पक्षप्रवेश रद्द झाल्याने हिरेंच्या समर्थकांचा मोठा हिरमोड झाला. त्यामुळे अद्वय हिरे यांनी धुळे मतदारसंघातून जनराज्य आघाडीकडून उमेदवारी करावी असा आग्रह काही समर्थकांनी धरला. तथापि हिरे यांनी स्वत: उमेदवारी करण्याचे टाळले होते. तसेच केवळ नरेंद्र मोदी यांना पाठिंबा ही भूमिका घेत धुळे, नाशिक व दिंडोरी या तिन्ही मतदार संघांमध्ये जनराज्य आघाडीची शक्ती महायुतीच्या मागे उभी करण्यात आली होती. अशा रीतीने गेल्या काही दिवसांपासून सलगी ठेवणाऱ्या हिरे बंधूंचा अखेर भाजपमध्ये प्रवेश झाला आहे. पक्षाच्या अंधेरी येथे आयोजित प्रदेश संमेलनाच्यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, प्रकाश जावडेकर, प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे, खासदार हरिश्चंद्र चव्हाण, खासदार डॉ. सुभाष भामरे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला.