आधुनिक काळात देशातील एक महत्त्वाचे शहर असा लौकिक असणाऱ्या ठाण्यास फार मोठा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. त्या ऐतिहासिक वारशाची अतिशय नेटकी सफर घडविणारे एक प्रदर्शन सध्या शहरात प्राच्य विद्या अभ्यास संस्थेद्वारे हाजुरी येथील दालनात भरविण्यात आले आहे. येत्या ३० नोव्हेंबपर्यंत हे प्रदर्शन रसिकांना विनामूल्य पाहता येईल.
साधारणपणे ऐतिहासिक ठाणे केवळ एका शहरापुरते मर्यादित नाही. प्राचीन काळातील ठाण्याचा अभ्यास करताना संपूर्ण जिल्हा, कोकण तसेच संपूर्ण पश्चिम किनारपट्टीचा अभ्यास अनिर्वाय ठरतो. प्राच्य विद्या अभ्यास संस्थेच्या माध्यमातून डॉ. विजय बेडेकर यांनी संकलित केलेला हा बहुमूल्य ठेवा ठाण्याच्या इतिहासावर महत्त्वपूर्ण प्रकाश टाकतो. ठाण्यातील किल्ले, खाडी किनारा, विविध तलाव आणि मंदिरांची जुनी चित्रे तसेच छायाचित्रे या प्रदर्शनात पाहता येतात. त्याचप्रमाणे वेळोवेळी शहरात निरनिराळ्या ठिकाणी उत्खननात मिळालेली नाणी या प्रदेशात कोणकोणत्या राजवटी नांदल्या याची साक्ष देतात. रामदेव यादवांच्या काळात चलनात असणारे आणि १९२६ मध्ये रस्ता रुंदीकरणात मिळालेले सुवर्ण पद्मटंक नाणे, त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातील दुर्मीळ होनही या प्रदर्शनात पाहायला मिळतात. औरंगजेबाने १६९३ मध्ये पाडलेली सोन्याची मोहोर तसेच मराठे आणि आदिलशाही राजवटीतील नाणीही प्रदर्शनात मांडण्यात आली आहेत. ठाणे न्यायालयाची जुनी इमारत, जुने ठाणे रेल्वे स्थानक , उत्खननात सापडलेली गणपतीची तसेच ब्रह्माची मूर्ती हे सर्व काही या दालनात नेटकेपणे मांडण्यात आल्याने इतिहासप्रेमींना सहजपणे ठाण्याच्या समृद्ध इतिहासाची नीट कल्पना येऊ शकते. मासुंदा तलावात  सापडलेल्या गणपतीच्या दोन शिलाहारकालीन मूर्ती प्रदर्शनात आहेत. आता हिंदू परंपरेत ब्रह्मपूजा निषिद्ध असली तरी हजार वर्षांपूर्वी ती प्रचलित असावी. कारण ठाणे परिसरात ब्रह्माच्या अनेक मूर्ती आढळून येत आहेत. अंबरनाथ येथील शिलाहारकालीन मंदिरातही ब्रह्माची मूर्ती आहे. नालासोपाऱ्यातही दोन ठिकाणी ब्रह्मदेवाच्या मूर्ती आढळून आल्या आहेत. प्रदर्शनातही ब्रह्माची एक मूर्ती पाहायला मिळते.
कोकणचा सर्वसाधारण इतिहास, प्राचीन ठाणे, मुसलमान कारकीर्द, पोर्तुगीज अंमल, ठाणे रेल्वे इतिहास, शिलाहारकालीन श्रीस्थानक राजवटीचा नकाशा, ब्रिटिशकालीन महसुली निर्णय असे अनेक अस्सल ऐतिहासिक दस्तऐवज प्रदर्शनात मांडण्यात आल्याने इतिहासप्रेमींसाठी ही फार मोठी संधी आहे. पत्ता- प्राच्यविद्या अभ्यास संस्था, महापालिकेचे ठाणे कला केंद्र, उर्दू शाळा क्रमांक ३२ च्या बाजूला, हाजुरी, ठाणे (प).