News Flash

इतिहासप्रेमी

मेकॅनिकल इंजिनिअर असल्याने नाशिकच्या एका मान्यताप्राप्त कंपनीत त्याला चांगल्या प्रकारची नोकरीही आहे. नाव ‘प्रशांत’ असूनही त्याच्या डोक्यात नवनवीन कल्पनांचे थैमान सुरू असते. कधी तो मनमाडच्या

| August 6, 2013 09:11 am

मेकॅनिकल इंजिनिअर असल्याने नाशिकच्या एका मान्यताप्राप्त कंपनीत त्याला चांगल्या प्रकारची नोकरीही आहे. नाव ‘प्रशांत’ असूनही त्याच्या डोक्यात नवनवीन कल्पनांचे थैमान सुरू असते. कधी तो मनमाडच्या पाणी प्रश्नाने अस्वस्थ होतो. मग ‘थस्र्टी मनमाड’ नावाचा एक अतिशय देखणेबल आणि वाचनीय असा ब्लॉग इंटरनेटच्या माध्यमातून फेसबूकवर साकार होतो. थोडेथोडके नव्हे तर, लाखाहून अधिक लोक त्यांच्या ब्लॉगला भेट देऊन या प्रयत्नाला दाद देतात. प्रतिक्रिया देतात. त्याच्या कल्पकतेचे भरभरून कौतुक करताना मनमाडची पाणी टंचाई जिल्ह्य़ाच्या, राज्याच्या मर्यादा ओलांडून थेट सातासमुद्रापलीकडे जाऊन पोहचते. मनमाडपर्यंत पाईपलाईनने पार मुंबईहून इंधन येते. मग पाईपलाईनने पाणी का नाही येत, हा त्याचा सवाल सर्वाना अंतर्मूख करून टाकतो. त्यामुळे प्रशांत रोटवदकर या नावाचे वेगळेपण सर्वाच्याच नजरेत भरल्याशिवाय रहात नाही.
इंटरनेटवर तासन्तास बसणारं, सर्वत्र ‘ऑनलाइन’ असणारं हे पोरगं किती संवेदनशील आणि सामाजिक जाणीव जपणारं आहे याचा प्रत्यय त्याच्या निरनिराळ्या पण लक्षात राहणाऱ्या उचापतींमुळे येतो. तो फेसबूकवर सतत काही ना काही ओतत असतो.  एखादा मेकॅनिकल इंजिनिअर कुठे वृक्षारोपणाचे महत्व सांगतो, तर कधी ‘पर्यावरण वाचवा हो!’ अशी अगदी आतली, मनपासूनची साद घालतो. कधी अंध, अपंग, मतीमंदांच्या प्रश्नाला ‘हौसला’ मार्फत सहजतेने हात घालतो तर कधी तरुण तरुणींना प्रेमाच्या गावाला नेऊन ‘दुनियादारी’ ची झलक मोठय़ा इमानदारीने घडवितो. प्रशांतचे वेगळेपण इंथवरच थांबत नाही. त्याचा ‘स्वातंत्र्य समर १८५७ चे’ हा वैशिष्टय़पूर्ण ब्लॉग इंटरनेटवर जणू नवी क्रांती घडविल असाच आहे. एबीपी माझाच्या उत्कृष्ट ब्लॉग स्पर्धेत पुरस्काराचा मानकरी ठरलेला प्रशांतचा हा ऐतिहासिक ब्लॉग. त्याचा हा उपक्रम अच्युत गोडबोले यांच्या कौतुकाचा विषय ठरला हे विशेष. प्रशांतचे १८५७ च्या उठावाचे वेड, त्याच्या झपाटलेपणाचेच लक्षण आहे. इतिहास हा विषय शालेय जीवनात त्याला खूप क्लिष्ट वाटे. पण प्रश्नोत्तरापेक्षा क्रांतिकारकांचा पराक्रम मनात साठवून ठेवण्यात त्याला जास्त रस होता आणि त्यातूनच क्रांतिकारकाबद्दलचे प्रचंड वेड त्याच्या अंगात शिरले.  त्याच्या या छंदाचे कौतुक माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी केले आहे. इतिहासातल्या सर्व ‘हिरो’ लोकांचे प्रशांतला लहानपणापासूनच आकर्षण. १८५७ चा उठाव पुस्तकातून वाचल्यानंतर तर त्याचेच हात जणू शिवशिवू लागले. मेकॅनिकल इंजिनियर झाला. नोकरी लागली. तरी त्याच्या डोक्यातून क्रांतिकारक काही जाईना. इतिहासाबद्दलची जिज्ञासा त्याचे हे वेड अधिक वाढविणारीच ठरली.
१८५७ च्या उठावात मंगल पांडेने वापरलेल्या बंदुकीची प्रतिकृती आपल्या संग्रही असावी यासाठी प्रशांतने अक्षरश: जीवाचे रान केले. ही प्रतिकृती मिळविण्याकरिता स्पेनपासून लंडनपर्यंत पत्र, फोन, इंटरनेट अशा सर्व माध्यमांचा उपयोग केला. स्पेनहून जहाजाने त्या बंदुकीची हुबेहुब प्रतिकृती आणणे खर्चिक असल्याने इंटरनेटवरून मिळालेल्या माहितीनुसार त्याने अखेर राजस्थानमधील कंपनीकडून रोख २५ हजार रुपये मोजून त्या बंदुकीची प्रतिकृती मिळवली. ज्या दिवशी ही बंदूक घरी येणार होती त्यावेळी तो पत्नी व मुलीला फिरायला घेऊन गेला होता. प्रतिकृती असलेले कुरीअर घरी येत असल्याचा फोन येताच त्या दोघींना रस्त्यातच सोडून हे महाशय तडक घरी गेले होते. इंटरनेटच्या माध्यमातून उठावाची खडा न खडा माहिती जमा करण्यात प्रशांतने तब्बल दोन वर्षे खर्ची घातली.
१८५७ च्या उठावाच्या बातम्या छापून आलेले अनेक वर्तमानपत्र त्याने कठोर परीश्रमातून मिळवले. ब्रिटीश ग्रंथालयातून ‘लंडन टाइम्स’चे कात्रण मिळविले. मंगल पांडे, तात्या टोपे, राजा कुंवरसिंह, बहादूरशाह जफर यांची चित्रे असलेली टपाल तिकीटे, ब्रिटीशकालीन नाणी, ब्रिटीशांच्या काळातील जाहिरनामे, सन्मानचिन्ह या सर्वाची छानसी जत्राच प्रशांतच्या घरी भरली आहे. संसारासाठी बचत करण्याऐवजी छंद पुढे नेण्याकरिता जाणीवपूर्वक बचतीचा अट्टाहास करणारा हा आधुनिक शिलेदार विरळाच. पेठे विद्यालयात चित्रकला शिक्षिका असणारी पत्नी आणि आईचा या छंदोमयी प्रवासात मोठा वाटा असल्याचे तो सांगतो. जुन्या परंपरेच्या स्मृती जागविणाऱ्या पाटा, वरवंटा, सूप, जातं. ट्रॅक, ठकीची बाहुली, अशा काही वस्तू कुशल कारागिरांकडून त्याने खास बनवून घेतल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 6, 2013 9:11 am

Web Title: history lover
Next Stories
1 शासकीय रुग्णालयात आता सीसी टीव्ही कॅमेऱ्यांची नजर
2 सत्ताधाऱ्यांविरोधात महाआघाडी स्थापन करण्याचे प्रयत्न निष्फळ
3 पावसाचा जोर ओसरला
Just Now!
X