पर्यटन व्यवसायाला चालना मिळावी, पर्यटकांना कमी खर्चात अधिक चांगला पर्याय देण्याच्या उद्देशाने ट्रॅव्हल एजंट असोसिएशन ऑफ नाशिक (तान)च्या वतीने १६ ते १८ जानेवारी या कालावधीत इंद्रप्रस्थ मंगल कार्यालयात ‘हॉलिडे कार्निव्हल २०१५’चे आयोजन करण्यात आले आहे. तसेच महोत्सवादरम्यान खास सोडत काढण्यात येणार आहे.
राज्यातून या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असल्याची माहिती तानचे अध्यक्ष दत्ता भालेराव यांनी पत्रकार परिषदेत दिली. शुक्रवारी सकाळी १०.३० वाजता राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते कार्निव्हलचे उद्घाटन होणार असून दीपक केसरकर या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. महोत्सवाचे वैशिष्टय़े म्हणजे, पहिल्यांदा एका छताखाली सर्व स्तरांतील प्रवाशांना पर्यटनांसाठीचे विविध पर्याय उपलब्ध होणार आहेत. त्यात जवळच्या सापुतारा पॅकेजपासून थायलंड, स्वित्र्झलड असे विविध पर्याय माफक दरात स्थानिक ट्रॅव्हल कंपन्यांनी उपलब्ध करून दिले आहेत. तसेच महोत्सवास भेट देणाऱ्या पर्यटनप्रेमींसाठी सोडत काढली जाईल. दररोज दोन भाग्यवंतांना शुभम वॉटर पार्क, इमॅजिकाची तिकिटे देण्यात येणार आहे. तसेच शेवटच्या दिवशी एकत्रित स्वरूपात चार भाग्यवंतांची निवड करत त्यांना थायलंड, कुमारकोम, हैद्राबाद, गोवा, कोकण, सापुतारा, भंडारदरा यांचे पॅकेज बक्षीस स्वरूपात देण्यात येणार आहे. महोत्सवात १०० हून अधिक स्टॉल्स मांडण्यात येणार असून त्यात थोमस कुक, कॉकस अ‍ॅण्ड किंग्ज, वीणा वर्ल्ड, टय़ुलिप हॉलिडेज, कोकण पर्यटन विकास संस्था, प्रसन्न हॉलिडेज अशा नामांकित ट्रॅव्हल कंपन्यांसमवेत चौधरी यात्रा कंपनी, योगेश ट्रॅव्हल्स, मातोश्री ट्रॅव्हल्स आदी स्थानिक संस्थांचा समावेश आहे.
महोत्सवात पर्यटनांचे अनेक पर्याय खुले करून देत असताना सामान्य पर्यटनप्रेमीच्या खिशावर ताण येणार नाही यादृष्टीने आकर्षक योजना जाहीर करण्यात येणार आहे. ‘नाशिकची ट्रॅव्हल सिटी’ म्हणून ओळख व्हावी यासाठी जिल्ह्यातील विविध पर्यटन स्थळांची माहिती फलक तसेच ‘स्लाइड शो’च्या माध्यमातून देण्यात येईल. कैलास मानसरोवर, युरोप, नेपाळ येथील पर्यटनस्थळांची माहिती दिली जाणार आहे. पर्यटनप्रेमींनी महोत्सवास भेट द्यावी, असे आवाहन भालेराव यांनी केले आहे.

‘ताण’चा पुढाकार..
नाशिक जिल्ह्यातील विविध पर्यटन स्थळांची माहिती विविध राज्यातील पर्यटकांसह परदेशातील पर्यटकांना व्हावी यासाठी ‘एमटीडीसी’च्या सहकार्याने ‘ताण’ने अभिनव संकल्पना मांडली आहे. ‘एमटीडीसी’ची वातानुकूलीत बस शनिवारी मुंबई येथील विविध पंचतारांकित हॉटेल मध्ये फिरेल, तेथील हौशी प्रवाशांना एक किंवा दोन दिवसांचे नाशिक दर्शन घडवून आणेल. ‘ताण’ त्यात केवळ समन्वयक म्हणून काम पाहणार असून उर्वरीत जबाबदारी ‘एमटीडीसी’ची राहणार आहे.