दवनीवाडा पोलीस ठाण्यांतर्गत पांढराबोडी येथे होलीराम ऊर्फ बाबा प्यारेलाल बिरनवार (३५) यांचा गळा आवळून खून करण्यात आला होता. दरम्यान, पाच वर्षांच्या तपासानंतर या प्रकरणातील खुन्याला पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणातील खुनी एक महिला असून तिचे नाव निला कोहळे (रा. पांढराबोडी) असे आहे.
होलीराम बिरनवार यांचा शेतातील आंजनाच्या झाडाखाली गळा आवळून खून केल्याची घटना २ मे २००८ ला उघडकीस आली होती. या प्रकरणी दवनीवाडा पोलिसांनी अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करून तत्कालिन ठाणेदार आय.ए. खान यांनी तपास केला. मात्र, या तपासातून गुन्हेगार हाती लागला नसल्याने, तत्कालीन पोलीस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांनी या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक तिजारे यांच्याकडे सोपविला. त्यांनी केलेल्या चौकशीतही गुन्हेगाराचा शोध न लागल्याने गुन्ह्याची ‘अ’ फायनल रिपोर्ट ३० एप्रिल २००९ रोजी तिरोडा येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयात दाखल करण्यात आली. न्यायालयाने रिपोर्टचा अभ्यास करून रिपोर्ट नामंजूर केला व पोलिसांना पुन्हा तपास करण्याचे आदेश दिले. त्यानंतर परिस्थितीचे गांभीर्य ओळखून जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप झळके यांनी या गुन्ह्याचा तपास २५ एप्रिल २०१३ ला गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक जयेश भांडारकर यांच्याकडे सोपविला.
पोलीस निरीक्षक जयेश भांडारकर व त्यांच्या चमूने या प्रकरणाच्या प्राथमिक तपासणीच्या अहवालाच्या आधारे चौकशीला सुरुवात केली. प्राथमिक चौकशी अहवालानुसार, २ मे २००८ या घटनेच्या दिवशी सायंकाळी साडेसातच्या सुमारास मृत होलीराम बिरनवार हा गावातील निला कोहळे हिच्या घरी सायकलने आल्याचे व तिच्याशी गप्पा करताना पाहिल्याचे मृताचा पुतण्या कमलेश लिखिराम बिरनवार याने सांगितले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजता होलीरामचा मृतदेह पांढराबोडी शिवारात शेतातील आंजनाच्या झाडाखाली आढळला. घटनास्थळी मृताची सायकल, खसखसची भाजी व पडलेला भात पोलिसांना मिळाला होता. दरम्यान, पोलिसांनी केलेल्या चौकशीत निला कोहळे हिने घटनेच्या रात्री आपल्या घरी चटणी केल्याचे सांगितले. प्राथमिक चौकशी अहवालातील निला कोहळे व घटनास्थळी सापडलेली खसखसची भाजी व मृताच्या पुतण्याने दिलेल्या बयाणावरून पोलीस निरीक्षक जयेश भांडारकर यांनी हेच धागेदोर पकडून तपासाला सुरुवात केली.  
या तपासात गावातीलच एका साक्षीदाराने निला कोहळे घटनेच्या दिवशी आपल्या दुकानात कांदे घेण्यासाठी आली व खसखसची भाजी करण्यासाठी कांदे घेत असल्याचे बयाण दिले. या साक्षीदाराचे बयाण व घटनास्थळी सापडलेली खसखसची भाजी, या दोन गोष्टीवरून पोलिसांनी निला कोहळे यांना ताब्यात घेतले व पोलिसी खाक्या दाखवून चौकशी केली असता निला कोहळे हिने आपणच होलीराम बिरनवार याचा खून केल्याचे कबूल केले. आरोपी निला कोहळे हिने पोलिसांना सांगितले, होलीराम व आपल्यात अनैतिक संबंध होते. आपण नेहमीच घटनास्थळी असलेल्या आंजनाच्या झाडाखाली रात्रीच्या वेळी भेटायचो. घटनेच्या दिवशी होलीराम आपल्या घरी आलेला असताना गावातीलच एक व्यक्ती तांदूळ घेऊन आला. ही बाब होलीरामला खटकली. दरम्यान, त्याच रात्री ९ वाजता खसखसच्या भाजीचा डब्बा घेऊन आपण नेहमीच्या जागेवर (घटनास्थळी) होलीरामला भेटायला गेले असता, मद्यधुंद असलेल्या होलीरामने तांदूळ आणणारा ती व्यक्ती कोण म्हणून डब्बा फेकून दिले व भांडण केले. तसेच झाडाच्या फांदीने बेदम मारहाण करून तुझे दुसऱ्याशी संबंध असल्याचा आरोप केला. त्यामुळे खोटा आरोप व मारहाणीने चिडून आपण होलीरामच्या टेरिकॉटच्या शर्टाने त्याचा गळा आवळून खून केला. त्यानंतर भीतीमुळे गावात न जाता रात्री दोनच्या सुमारास गोकुळ सिहारे याच्या शेतातील घरी जाऊन त्याला घरी पोहोचविण्याची गळ घातली. मात्र, गोकुळ सिहारे याने जोपर्यंत काय झाले, हे सांगणार नाही तोपर्यंत घरी सोडून देणार नाही, असे म्हटल्याने, आपण घडलेला प्रकार सिहारे याला सांगितला. त्यानंतर दोघेही घटनास्थळी गेले असता होलीराम मृतावस्थेत पडलेला होता. दरम्यान, या प्रकरणात गोकुळ सिहारे हा महत्त्वाचा साक्षीदार मिळाल्याने आपणच खून केल्याचे निला कोहळे हिनेच कबूल केले. तब्बल पाच वर्षांनंतर या प्रकरणातील खुन्याला शोधण्यात पोलिसांना यश मिळाले. हा तपास पोलीस अधीक्षक दिलीप झळके, उपविभागीय पोलीस अधिकारी गिऱ्हे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे जयेश भांडारकर, सहायक फौजदार नवखरे, पोलीस हवालदार काळे, पोलीस नायक गिरीश पांडे यांनी केली. दरम्यान, पाच वर्षांनंतर का होईना, खुनाचा आरोपी पकडल्याबद्दल मृताच्या कुटुंबीयांनी समाधान व्यक्त केले आहे.