रायगडचे माजी खासदार, शेतकरी, कष्टकऱ्यांचे नेते आणि शेवटच्या क्षणापर्यंत आपले जीवन लढय़ात व्यतीत करणाऱ्या दि. बा. पाटील यांच्या प्रथम स्मृतिदिनाच्या निमित्ताने उरण तालुक्यातील विविध ठिकाणी त्यांना आदरांजली वाहण्यात आली. रयत शिक्षण संस्थेच्या शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनीही आदरांजली वाहिली. ठिकठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या या आदरांजली सभेतून दिबांनी केलेल्या कामाची माहिती देण्यात आली.
उरण तालुक्यातील जासई गावात जन्म झालेल्या दि. बा. पाटील यांनी आपले संपूर्ण आयुष्य शेतकऱ्यांच्या मागण्या मिळविण्यासाठी खर्ची घातले. लढय़ावर विश्वास असणाऱ्या दि. बा. पाटील यांनी देशातील शेतकऱ्यांना साडेबारा टक्केचा जमिनीचा मोबदला देण्यास भाग पाडले. त्याचप्रमाणे ब्रिटिशकालीन १८९४ चा भूसंपादन कायदा बदलून नवा कायदा करण्यास भाग पाडले. तीस वर्षे प्रलंबित असलेला जेएनपीटी साडेबारा टक्केचा प्रश्न सोडविण्यासाठी तसेच सिडको प्रकल्पग्रस्त, बाराबलुतेदार, आदिवासी, भूमिहीन यांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी सिडकोविरोधात आंदोलने केली. दिबांनी उरण-पनवेलमधील मागास समाजाला शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी रयत शिक्षण संस्थेच्या शाळा, महाविद्यालये उभी केली, अशा अनेक गोष्टी करून खऱ्या अर्थाने कष्टकरी व गरिबांना न्याय मिळवून देण्याचे काम त्यांनी केले. १९८४ च्या प्रसिद्ध उरण शेतकरी आंदोलनातील जासई येथील हुतात्मा स्मारकात अनेकांनी दिबांना आज आदरांजली वाहिली.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 25, 2014 8:34 am