ठाणे जिल्ह्य़ातील जवळापूर गावातून नाटय़क्षेत्रात पदार्पण केलेले केशवराव मोरे यांनी नाटय़ क्षेत्रातील अभिनय, दिग्दर्शनामध्ये आपल्या कार्य कर्तृत्वाचा ठसा उमटवला. १२५ नाटकांचे दिग्दर्शन आणि अभिनयामध्ये योगदान दिलेल्या या रंगकर्मीचा तृतीय स्मृतिदिन नुकताच झाला असून त्या निमित्ताने ठाण्यातील अभिनय कट्टय़ाच्या वतीने त्यांना कलात्मक आदरांजली अर्पण करण्यात आली.
ठाण्यातील अभिनय कट्टय़ाच्या कलाकारांनी त्यांच्या आठवणींना या निमित्ताने उजाळा दिला. केशवराव मोरे यांचे मूळ गाव शिरवळ हे होते. पुढे ठाण्यातील जवळापूर येथून त्यांनी नाटय़क्षेत्रात पदार्पण केले. अभिनय आणि दिग्दर्शन या दोन्ही भूमिका त्यांनी यशस्वीपणे सांभाळल्या. श्याम फडके यांची तीन चौक तेरा, काका किशाचा, शशिकांत कुलकर्णी यांची खुनी पळाला, काळजी नसावी अशी नाटके त्यांनी केली. तर मनोकामाना या मराठी नाटकाचे त्यांनी  हिंदीत भाषांतर केले होते. १९८० पासून नाटय़शिबीर मराठी नाटकांचा इतिहास, मराठी रंगभूमीचा धुर्वनितीका,अभिनय, दिग्दर्शन या विषयांवर त्यांनी नवोदितांना व्याख्याने देऊन मार्गदर्शनाचा उपक्रमही राबवला होता.
शासनाच्या शिबिरांमध्येही त्यांनी मार्गदर्शन केले. प्रसिद्धीच्या वलयापासून दूर राहिलेले केशवराव मोरे यांच्या स्मृतीला आदरांजली या वेळी व्यक्त केली. या वेळी अभिनय कट्टय़ावर राधिका वेलकरण यांनी ती फुलराणी, उदय देशमुख यांनी नटसम्राट, आदित्य तेरवकर यांनी एकच प्याला, सौरभ मुळे यांनी कुंतिपुत्र वक्रोदर या एकपात्री प्रयोगांचे सादरीकरण केले. तर आनंद म्हसवेकर लिखित व प्रवीण पाचपुते दिग्दर्शित तमाशा ऑफ ह्य़ुमॅनिटी या एकांकिकेचे सादरीकरण या वेळी करण्यात आले.