मराठय़ांच्या शौर्य व त्यागाच्या समजल्या जाणा-या पानिपत रणसंग्रामाचा २५४ वा स्मृतिदिन पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथे सिदोजीराव नाईक-निंबाळकर स्मृती प्रतिष्ठानच्यावतीने पाळण्यात आला. मंगळवेढय़ातील संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष अ‍ॅड. नंदकुमार पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास वयोवृद्ध इतिहास संशोधक गोपाळराव देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रारंभी प्रसिद्ध बाबर घराण्यातील जगदीश बाबर (सोनंद डोंगरगाव-सांगोला)यांनी पानिपत व पत्थरगड येथून आणलेल्या स्मृतिकलशाचे पूजन करण्यात आले. राजेद्रसिंह नाईक-निंबाळकर यांनी प्रास्ताविक केले.
मराठेशाहीच्या कालखंडावर आधारित ‘सोलापूर जिल्ह्य़ाचा इतिहास’ हा संशोधनपर ग्रंथ लिहिलेले गोपाळराव देशमुख यांनी या वेळी बोलताना पानिपतच्या रणसंग्रामात सोलापूर जिल्ह्य़ातील भाळवणी व सोनंद डोंगरगावच्या घराण्यांचे योगदान व त्यांच्या प्रेरणादायी कर्तृत्वावर प्रकाशझोत टाकला. मराठा सत्ता विस्तारण्याचे खरे कार्य निष्ठेने व प्रामाणिकपणे करणारे भाळवणीचे नाईक-निंबाळकर घराणे व सोनंद डोंगरगावचे बाबर घराणे यांना दुर्लक्षून चालणार नाही. विशेषत: सिदोजीराव बाबर यांच्या घराण्यातील वीरमर्दानी पानिपतच्या युध्दावर जाताना कर्ज काढले होते. हे कर्ज परत फेडले नाही. कर्ज काढून युध्दावर जाणे व हौतात्म्य पत्करणे ही बाब इतिहासात दुर्मीळ असल्याचा उल्लेख देशमुख यांनी केला.
जगदीश बाबर यांनी प्रत्यक्ष पानिपतच्या रणभूमीवर जाऊन आपापल्या पूर्वजांनी केलेल्या पराक्रमांचे स्मरण करताना भारावून गेल्याचे नमूद केले. या वेळी व्यसनमुक्ती संघाचे धैर्यशील देशमुख, सुरेश पवार गुरूजी (मरवडे), प्रा. डॉ. दत्तात्रेय मगर, विलास देशमुख (मुंबई) आदींनी मनोगत मांडले. या प्रसंगी गुणवंत शालेय विद्यार्थ्यांना बक्षिसे वितरित करण्यात आली. अ‍ॅड. नंदकुमार पवार यांनी ‘इतिहास’ विषयावर प्रेम व्यक्त करताना सोलापूर जिल्हा इतिहास अभ्यासक मंडळाची स्थापना केल्याचे जाहीर केले. या कार्यक्रमास पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक भगवानराव चौगुले, सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष गोरख ताड, भाळवणी गावचे सरपंच शिंदे, प्रा. डॉ. अप्पासाहेब पुजारी आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धनंजय धोत्रे यांनी केले.