शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय क्षेत्रांत साडेतीन तपे घोंघावणारे वादळ शांत झाले आहे, अशा शब्दांत हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना कोल्हापुरातील सर्व राजकीय पक्ष, सामाजिक संघटना आणि हिंदुत्ववादी संघटनांसह शिवसेनाप्रमुखांवर प्रेम करणाऱ्या चाहत्यांनी छत्रपती शाहू स्मारक भवन  येथे आयोजित केलेल्या शोकसभेत श्रध्दांजली अर्पण केली.
सुरुवातीस मान्यवरांच्या उपस्थितीत बाळासाहेब ठाकरे आणि मीनाताई ठाकरे यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. शिवसेना आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांनी,‘‘ जातीपातीचे राजकारण न पाहता शिवशक्ती-भीमशक्तीच्या या प्रणेत्याला माझे शतश: वंदन,’’ अशा शब्दांत आदरांजली वाहिली. आमदार चंद्रदीप नरके यांनी ‘‘ एका युगपुरूषाचा, विकासाच्या आधारवडाचा अस्त झाला आहे,’’ अशा शब्दात श्रध्दांजली अर्पण केली. आमदार राजेश क्षीरसागर यांनी सर्वसामान्य शिवसैनिकांना साहेबांनी कसे मोठे केले याचे दाखले देत उभ्या महाराष्ट्राचा आधारवड हरपला आहे असे सांगत प्रत्येक शिवसैनिकाला,‘‘ साहेब गेले नाहीत, तर ते आपल्यातच आहेत. त्यांच्या विचारांना व स्वप्नांना पुढे नेण्याकरिता प्रत्येक सैनिकाने तयार रहावे,’’ असे आवाहन केले.
शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे यांनी,‘‘ साहेबांनी संयुक्त महाराष्ट्राचा व सीमाभागाचा जो लढा चालू केला आहे तो आपण सर्वांनी असाच पुढे नेला पाहिजे, हीच त्यांना खरी श्रध्दांजली ठरेल,’’ असे मत व्यक्त केले. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी,‘‘ साहेब हे सदैव हिंदुत्ववादी संघटना व शिवसैनिकांना एक टॉनिक म्हणून राहिले आहेत. त्यांच्या स्वप्नांना पूर्ण करण्याचे कर्तव्य सर्व शिवसैनिकांचे आहे,’’ अशी आदरांजली वाहीली.
 सभेच्या अध्यक्षा महापौर कादंबरी कवाळे म्हणाल्या, की आजपर्यंत कित्येक नेते आले नी गेले. काहींनी सरडय़ाप्रमाणे रंग बदलले, परंतु अखेरपर्यंत भगव्या ध्वजाशी प्रामाणिक राहून स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी उभ्या देशाचे हिंदुत्व जपले. असा नेता पुन्हा होणे नाही.
माजी आमदार सुरेश साळोखे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आर.के.पोवार, भाजपा महानगरजिल्हाध्यक्ष महेश जाधव, आर.पी.आय. चे जिल्हाध्यक्ष पंडीतराव सडोलीकर, मराठा महासंघाचे वसंतराव मुळीक, ब्लॅक पँथरचे सुभाष देसाई, शिवराष्ट्र धर्म संघटनेच्यावतीने दिलीप भिवटे, हिंदुजनजागरणचे मधुकर नाझरे, मनसेचे राजू दिंडोर्ले ,अभिजित साळोख़े, प्रजासत्ताक संघटनेचे दिलीप देसाई,  हिंदू युवा संघटनेचे अशोक देसाई, महेश उरसाल, कोळी समाजाच्या सुमन कोळेकर आदींनी आपली मनोगते व्यक्त केली.