दोन वर्षांपूर्वीच निर्माण झालेल्या आणि कैद्यांच्या प्रतीक्षेत असलेल्या जिल्हा कारागृहाला राज्याचे गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी प्रजासत्ताक दिनी भेट देऊन पाहणी केली असता उद्घाटनापूर्वीच झालेली दैनावस्था बघून गृहमंत्र्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
दोन वर्षांपूर्वीच बांधकाम पूर्ण झालेल्या या अत्याधुनिक कारागृहातील साहित्याची तोडफोड करून विद्युतीकरणाचे सर्व केबल्स चोरटय़ांनी पळवले आहेत. कारागृहाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात आलेल्या सदनिकांना उद्घाटनाआधीच तडे गेलेले आहेत. ही दैनावस्था बघून पालकमंत्र्यांनी नाराजी व्यक्त करून तात्काळ डागडुजी करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. यासोबतच राज्याच्या कारागृह माहानिरीक्षकांना गडचिरोलीचा दौरा करून कारागृहाची पाहणी करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
गडचिरोली येथील प्रजासत्ताक दिनाचा मुख्य सोहळा आटोपल्यानंतर गृहमंत्री पाटील यांनी जिल्हा कारागृहाची पाहणी केली.
यावेळी त्यांना नव्या वास्तूची अल्पावधीतच झालेली वाताहत प्रत्यक्ष बघायला मिळाली. दोन वर्षांपूर्वीच या कारागृहाचे बांधकाम पूर्ण होऊनही हस्तांतरणाची प्रक्रिया रखडल्याने असामाजिक तत्त्वांनी कारागृहात शिरून केबल्स पळवून नेल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले. राज्यातील हे अत्याधुनिक कारागृह असून त्यात ५०० कैदी ठेवण्याची क्षमता आहे. १७.५ हेक्टर परिसरात बांधण्यात आलेल्या या कारागृह परिसरात अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी ४४ सदनिका बांधण्यात आलेल्या आहेत, मात्र उद्घाटनापूर्वीच सदनिकांना तडे गेल्याचे गृहमंत्र्यांच्या नजरेस पडले.
कारागृहाच्या बांधकामासाठी २००३ मध्ये प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर वेगवेगळ्या कंत्राटदारांकडून बांधकाम करण्यात आले. मार्च २०११ मध्ये बांधकाम पूर्ण झाले. सर्व बांधकाम पूर्ण झाले असतानाही हस्तांतरणाची प्रक्रिया रखडल्याचे गृहमंत्र्यांच्या लक्षात आणून देण्यात आले.
अज्ञात चोरांनी कारागृहात प्रवेश करून साहित्याची तोडफोड करून केबल्स लंपास केल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
त्यामुळे विद्युतीकरणाची सोय करण्यासाठी पुन्हा लाखो रुपयांचा भरुदड शासनाला सहन करावा लागणार आहे. कारागृहाची दुरवस्था बघितल्यानंतर गृहमंत्र्यांनी नाराजी व्यक्त करत राज्याच्या कारागृह महानिरीक्षकांशी भ्रमणध्वनीवरून चर्चा केली. पुढील आठवडय़ात राज्याचे कारागृह महानिरीक्षक गडचिरोलीचा दौरा करून कारागृहाची पाहणी करतील व कारागृहाच्या हस्तांतरणाबाबत पुढील कार्यवाही करतील, अशी माहिती यावेळी आर.आर. पाटील यांनी दिली.