काही महिन्यांपूर्वीची घटना. वरळीत राहणाऱ्या अंकुर शिंदे (नाव बदललेले) याला जास्मिन नावाच्या एका अनोळखी मुलीचा फोन आला. फोनवरून मैत्री वाढली. फेसबुकवर ती फुलली. फोनवरून संभाषण सुरू झाले आणि अंकुर जास्मिनच्या प्रेमात पडला. भेट ठरली. फेसबुकवर जास्मिनचे लोभस रूप पाहून अंकुर तिच्यावर अधिकच भाळला. जास्मिनने त्याला संध्याकाळी उशीरा एका निर्जन ठिकाणी डेटवर बोलावले. एकांतात डेट म्हटल्यावर अंकुर खुलला आणि स्वप्न रंगवत देवनारला गेला.. पण जास्मिनच्या ऐवजी त्याला भेटले जास्मिनचे दोन ‘भाऊ’. त्यांनी अंकुरची यथेच्छ पिटाई करुन त्याचे पैसे, सोन्याची चेन लुबाडून पोबारा केला. आपण फसविले गेल्याचे अंकुरच्या लक्षात आले. त्याने पोलिसांकडे धाव घेतली. त्याला लुटणारे दोन भामटे तरुण तर सापडले.. पण जास्मिन कुठे गेली..? अखेर जास्मिन म्हणजेच लुटारुंपैकीच एक तरुण असल्याचे निष्पन्न झाले. होय मुलगी नव्हे, तरूणच! मोबाईलवरील सॉफ्टवेअरचा आधार घेत त्याने मुलीचा आवाज काढला होता. जास्मिन बनून त्याने अंकुरला लुटण्याची योजना बनवत हा ‘हनी ट्रॅप’ लावला होता..
चीनच्या स्वस्त मोबाईलमध्ये सध्या अशी सॉफ्टवेअर मिळतात. त्यात पुरुषी आवाजात बोललो तर तो मुलीच्या आवाजात रूपांतरीत होतो. त्यामुळे मोबाईलवरून आपल्याशी मुलगीच बोलते आहे, असे वाटते. केवळ गमतीसाठी हे सॉफ्टवेअर बनवले गेले आहे. परंतु त्याचा वापर करत असे फसवणुकीचे गुन्हे घडत आहेत.
हनी ट्रॅपचे आणखी उदाहरण मुंबई पोलिसांच्या मालमत्ता विभागाने गुरुवारी उघडकीस आणले. ‘स्प्लीटकॅम’ नावाचे एक सॉफ्टवेअर इंटरनेटवर उपलब्ध आहे. ते डाऊनलोड केल्यास कुठल्याही मुलीचा चेहरा लावून चॅटिंग करता येते. इंटरनेटवर मुली चॅटिंग करत असलेल्या अनेक चित्रफिती उपलब्ध आहेत. ती चित्रफित या सॉफ्टवेअरद्वारे आपल्या चॅटिंगला जोडता येते. त्यामुळे समोरच्या व्यक्तीला खरोखरच मुलगी चॅटिंग करतेय असे वाटते. याच सॉफ्टवेअरचा आधार घेत अहमदाबाद येथील निखिल लाला या एमबीए झालेल्या तरुणाने मुंबईच्या जिग्नेश व्होरा (नाव बदलले) या विवाहित तरुणाला गंडविले. स्प्लीटकॅम द्वारे चॅटिंग करत त्याने आपण मुलगी असल्याचे भासवले. वेब कॅमवर प्रत्यक्ष मुलगीच दिसत असल्याने जिग्नेश अलगद या हनी ट्रॅपमध्ये अडकला. अवंतिका बनलेल्या निखिलने या तरुणाला आपले कपडे उतरविण्यास सांगितले. यावेळी अन्य एक मुलगी स्वत:चे कपडे उतरवित असल्याची चित्रफित निखिलने जोडली होती. त्यामुळे अवंतिकासुद्धा कपडे उतरवते हे पाहून जिग्नेशनेही आपले कपडे उतरवले. निखिलने अनावृत्त झालेल्या जिग्नेशची चित्रफित रेकॉर्ड करून ठेवली होती. नंतर याच चित्रफितीद्वारे त्याला ब्लॅकमेल करण्यास त्याने सुरवात केली. पोलिसांनी त्याला नंतर पकडले हा भाग वेगळा. स्प्लीटकॅममुळे मुलगी बनून कुणालाही गंडविता येते. हा एक प्रकारचा हनी ट्रॅप असल्याचे मालमत्ता विभागाचे पोलीस निरीक्षक नंदकुमार गोपाळे यांनी सांगितले.
काही वर्षांपूर्वी हनी ट्रॅप वेगळ्या प्रकारे वापरला जात असे. एखादा बऱ्यापैकी श्रीमंत तरुण हेरला जायचा. एक मुलगी त्याला फोन करून मैत्री करायची. सुंदर मुलगी मैत्री करण्यासाठी स्वत:हून पुढे आल्यावर सहसा कुणी नकार देत नाही. ही मुलगी त्याला प्रत्यक्ष भेटायची आणि विश्वास संपादन करायची. मग प्रेम व्यक्त करायची. हे सर्व अगदी आठवडा पंधरा दिवसातच. मग एकदा ती मुलगी फोन करून सांगायची, माझ्या घरी कुणी नाही, भेटायला ये. पार्टी करूया. मग तो तरुण भेटायला जायचा. घरात कुणी नसायचं. तो त्या तरुणीच्या मिलनाची स्वप्न प्रत्यक्षात आणण्यापूर्वी तिचे बाहेर लपलेले साथीदार दुसऱ्या चावीने दार उघडून घरात यायचे. ही आमची बहीण आहे, तिच्यासोबत असे चाळे करतो, म्हणून त्याला बदडायचे आणि त्याचे पैसे लुटायचे. बदनामीपोटी श्रीमंत तरूण तक्रार करीत नसे. मुलीच्या भावाला कळलं म्हणून आपली प्रेम कहाणी संपली असे समजून तो विषय संपवून टाकायचा. मुंबईसह मीरा रोड पोलीस ठाण्यात काही तरुणांनी हिम्मत दाखवून अशा प्रकारे फसवले गेल्याची तक्रार दाखल झाल्यानंतर या टोळीचा पदार्फाश झाला होता.
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि मुलगी असल्याची बतावणी करून लुबाडण्याच्या घटना गेल्या काही दिवसांत वाढल्या आहेत. बदनामीपोटी सहसा कुणी याविरुद्ध तक्रार करत नाही. परंतु आता तरुणांनी कुणाशीही मैत्री करण्यापूर्वी सावध राहायला हवे. बोलते आहे ती, नव्हे दिसते आहे तीसुद्धा खरेच मुलगी असेलच याची खात्री देता येत नाही. आणि ती खरोखरच मुलगी असली तरी ती एखाद्या टोळीच्या माध्यमातून फसवतही असू शकते. त्यामुळे शक्यतो अनोळखी मुलींपासून चार हात लांबच राहिलेले बरे. मैत्री करायला आलेली कुठलीही मुलगी ही हनी ट्रॅप असू शकते हे लक्षात ठेवा!
इंटरनेटच्या माध्यमातून होणारे गुन्हे आता आपल्याला माहीत झाले आहेत. अशा गुन्ह्यांत फसलेल्यांना त्याविरुद्ध उघडपणे आवाज उठवता येतो. जाहीरपणे पोलिसांकडे दाद मागता येते आणि ‘आपल्याबाबत असे झाले, तुम्ही सावध राहा’, असा सल्ला इतरांनाही देता येतो. परंतु याच इंटरनेटवरील काही अत्याधुनिक सॉफ्टवेअरमुळे एखाद्याला हातोहात फसवणे आता अगदीच सोपे झाले आहे. परत ही फसवणूक तथाकथित मुलीच्या नावाने होत असल्याने त्याबाबत उघडपणे तक्रारही करता येत नाही. अशा काही घटना अलीकडेच उघडकीस आल्या आहेत. ‘मुलगी दिसली म्हणून पाघळू नका’ असा थेट संदेश या घटना देत आहेत.
हनी ट्रॅप म्हणजे काय?
एखाद्याकडून गुप्त माहिती काढण्यासाठी महिलांचा वापर करून त्याला आपल्या जाळ्यात ओढायचे याला हनी ट्रॅप म्हणतात. या पद्धतीला जगभरात सर्वत्र हजारो वर्षांचा इतिहास आहे. (विश्वामित्राची तपश्चर्या भंग करण्यासाठी मेनकेला पाठविण्यात आले होते. हाही पुराणातला ‘हनी ट्रॅप’च म्हणायचा!) गुप्तहेरांपेक्षा हे काम प्रभावी मानलं जातं. बॉण्डपटात हटकून असा हनी ट्रॅप बघायला मिळतो.  दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील ‘हनी ट्रॅप’ खूप गाजले होते. मॅच फिक्सिंग प्रकरणात बुकींकडून असा ‘हनी ट्रॅप’ लावल्याचे नुकतेच समोर आले होते. मंत्री, व्यावसायिक, खेळाडू या हनी ट्रॅपमध्ये अडकल्याची अनेक उदाहरणे आहेत.