12 July 2020

News Flash

गौरव एका ‘विद्रोह’चा.. सत्कार एका कवीचा

आंबेडकरवादी विद्रोही कवी म्हणून मराठी काव्यक्षेत्रास परिचित असलेले येथील कैलास पगारे यांचा जाहीर नागरी सत्कार कविवर्य नारायण सुर्वे

| January 31, 2015 01:03 am

आंबेडकरवादी विद्रोही कवी म्हणून मराठी काव्यक्षेत्रास परिचित असलेले येथील कैलास पगारे यांचा जाहीर नागरी सत्कार कविवर्य नारायण सुर्वे सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने १ फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच वाजता आयोजित करण्यात आला आहे. परशुराम साईखेडकर नाटय़गृहात होणाऱ्या या कार्यक्रमात ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. गंगाधर पानतावणे यांच्या हस्ते व ज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून महापौर अशोक मुर्तडक, माजी मंत्री विनायकदादा पाटील हे उपस्थित राहणार आहेत. मराठी साहित्यातील लढाऊ कवी आणि कार्यकर्ते म्हणून पगारे हे प्रसिद्ध असून त्यांची एकसष्टी आणि ‘माणूसनामा’ या चौथ्या काव्यसंग्रहाच्या निमित्ताने त्यांच्या काव्यशैलीचा संजय चौधरी यांनी घेतलेला थोडक्यात वेध.
कैलास पगारे यांची कविता मूलत: माणसाची कविता आहे. माणूस हा कवीच्या चिंतनाचा विषय आहे. त्यांची कविता माणसाच्या संघर्षांची, सुखदु:खाची आणि जगण्याच्या लढाईची कविता आहे. सव्‍‌र्हे, याही मोसमात आणि मल्टिनॅशनल वॉर या त्यांच्या तीनही संग्रहांतून माणसासाठी लिहिणारी त्यांची लेखणी सर्वानाच दिसली आहे. ‘माणूसनामा’ या काव्यसंग्रहानेही पुन्हा तेच सिद्ध केले आहे. माणसाच्या उत्थानासाठी सदैव झिजणारी त्यांची लेखणी आहे.
हे हात आता हात राहिले नाहीत
ते केव्हाच पोलाद झालेत
ते मोडतील पण वाकणार नाहीत
ते तुटतील पण झुकणार नाहीत
ते लढतील पण थकणार नाहीत
अशा प्रकारे लढणाऱ्या हातांना बळ देणारी त्यांची लेखणी आहे. कवीची नजर कळीकाळाची चौकीदार आहे. ती दु:खाची वीण घट्ट विणत जाताना दिसते. माणूस शोधणारी, त्याच्या निखळपणाचा शोध घेणारी कविता माणूसनामामध्ये भेटते.
मी एक माणूस शोधतोय
माणूसमय झालेला
आरपार स्फटिकासमान
एकूणच अस्सल माणसाच्या शोधात निघालेली कविता पगारे यांनी रसिकांसमोर ठेवली आहे. माणसाच्या भुकेची.. प्रश्नाची.. नात्याची.. भ्रमनिरासाची.. एकटेपणाची.. हक्काची अशा विविध पैलूंची कविता माणूसनामा या संग्रहात आहे. असं जगणं शब्दांत न उतरलं तरच नवल. कवी आयुष्यभर कार्यकर्त्यांच्या भूमिकेत आहे. कामगारांचे प्रश्न, समस्या याची त्यांना जाण आहे. जगाचं राजकारण आणि अर्थकारण याची जाण आहे. त्यांची कविता अधिक प्रगल्भ आणि परिपक्व झाली आहे. केवळ मोठमोठे शब्द उपयोगी नाहीत, तर शहाण्या कृतीची आवश्यकता आहे, हे कवीने जाणले आहे. ही लढाई एकटय़ाची नव्हे, हे सत्य कवीने मांडले आहे. माणसाविषयी लिहिताना आगळ्यावेगळ्या प्रतिमांचा वापर कवीने केला आहे.
शब्दांचे लाख रावे
थबकतात, गातात, थिरकतात
अक्षरांच्या बागेत झिम्मा खेळतात
अशा प्रकारचा बदलरूपी खेळ करणारी आणि जग बदलू पाहणाऱ्या कवितांच्या जनकाच्या गौरवासाठी काव्यरसिकांनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संजय चौधरी यांच्यासह कविवर्य कैलास पगारे नागरी सत्कार समिती आणि कविवर्य नारायण सुर्वे सार्वजनिक वाचनालय यांच्या वतीने करण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 31, 2015 1:03 am

Web Title: honor to a poet
टॅग Honor,Poet
Next Stories
1 भरारी पथकामार्फत जिल्ह्य़ातील धान्य गोदामांची तपासणी
2 आदिवासी भागात सौर प्रकल्प हाती घेण्याची राज्यपालांची सूचना
3 गोदाघाटची ओळख संपूर्ण देशात होईल
Just Now!
X