धडगाव व अक्कलकुवा तालुक्यातील वाडय़ा-पाडय़ात आरोग्य व शिक्षणविषयक आरोग्य अभियान, मानव विकास कार्यक्रम अशा विविध योजनांची माहिती देऊन त्या भागात जनजागृती करणाऱ्या आशा सेविकांचा गौरव महिला दिनी करण्याची सूचना जिल्हाधिकारी ओमप्रकाश बकोरिया यांनी केली आहे.
जिल्हा मानव विकास कार्यक्रम समितीची आढावा बैठक जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीस ते मार्गदर्शन करत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष जयपालसिंह रावल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ए. एस. आर. नायक, जिल्हा नियोजन अधिकारी विलास गवळी उपस्थित होते. नावीन्यपूर्ण योजनेतंर्गत ज्या शाळांना संगणक, स्कॅनर, प्रिंटर देण्याता आले आहेत त्यांची सद्यस्थिती, संगणक असलेल्या शाळांमधील वीजपुरवठा याबाबत माहिती देण्याची सूचनाही त्यांनी केली. धडगाव तालुक्यातील दुर्गम भागात मेगाफोन देण्यात येणार असून त्याव्दारे आरोग्य विषयक कार्यक्रम व मानव विकासाची माहिती जनतेला देण्यात येणार आहे. स्त्रीरोगतज्ज्ञ, बालरोगतज्ज्ञ, जिल्हा आरोग्य अधिकारी, स्वयंसेवी संघटनांचे प्रतिनिधी यांची समिती स्थापन करून गर्भवती, स्तनदा माता यांना आरोग्यविषयक सुविधांविषयी मार्गदर्शन करण्याची गरज आहे. बस स्थानक, बाजार अशा वर्दळीच्या ठिकाणी आरोग्य अभियान, मानव विकास यांची माहिती असलेले फलक उभारावेत, एक किंवा दोन मुलीनंतर शस्त्रक्रिया करणाऱ्या मातेचा व सर्वशिक्षा अभियानात जनजागृतीसाठी भरीव काम करणाऱ्या परिचारिका, आशा सेविका यांची महिला दिनी आठ मार्च रोजी जिल्हा बालकल्याण विकास अधिकाऱ्यांनी कार्यशाळा घेऊन उत्कृष्ट काम करणाऱ्या परिचारिका, आशा सेविकांचा सन्मान करावा अशी सूचना यावेळी जिल्हाधिकारी बकोरीया यांनी दिली.