गेल्या मार्च-एप्रिलपासून तीव्र झालेल्या पाणीटंचाईने अजूनही पाठ सोडली नाही. तीव्र दुष्काळ अनुभवताना मराठवाडय़ातल्या प्रत्येक माणसाच्या मनात पावसाची आस किती असेल? रोज त्याची आठवण काढावी, अशीच स्थिती! मागच्या चार दिवसांपासून आभाळ फिरू लागले. केरळात मान्सून आल्याच्या बातम्या आल्या. तेव्हा ढगांची दाटीही दिसू लागली. आता पाऊस येईल असे वातावरण निर्माण झाले आणि जूनच्या पहिल्या तारखेला पावसाने हजेरी लावली. मराठवाडय़ात तो काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह आला आणि काही ठिकाणी नुसता बरसून गेला. औरंगाबाद जिल्ह्य़ात खुलताबादवगळता सोमवारी सर्वत्र पाऊस झाला. तीव्र दुष्काळ असणाऱ्या उस्मानाबाद, औरंगाबाद, बीड आणि जालना या जिल्ह्य़ांमध्ये पावसाने हजेरी लावली.
पाणीटंचाईमुळे अजूनही मराठवाडय़ात दोन हजारांहून अधिक टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. छावण्यांमध्ये जनावरे दाखल आहेत. साहजिकच शेतकऱ्यांची मशागतीसाठी मोठी धावपळ झाली. बहुतेकांनी ट्रॅक्टर लावून मशागत करण्यावर भर दिला. गेल्या दोन दिवसांपासून हवेतील उष्मा बराच कमी झाला आहे. कोठे तरी चार थेंब का असेना पावसाच्या सरी बरसून जातात. त्यामुळे गारवा निर्माण होत आहे. काही जिल्ह्य़ांमध्ये मात्र वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली.
शहरात रविवारी रात्री पावसाने हजेरी लावली. तसा हा पहिलाच पाऊस. तान्हुला म्हणता येईल, एवढाच. पण त्याच्या नुसत्या येण्याने वातावरणात उत्साह निर्माण झाला आहे. फुलंब्री, पैठण, सिल्लोड, सोयगाव, कन्नड, वैजापूर, गंगापूर तालुक्यांत पावसाने हजेरी लावली. सोयगाव, कन्नड व वैजापूर तालुक्यांत त्याची हजेरी आशादायी चित्र निर्माण करणारी आहे. सरकारी कार्यालयावरील पर्जन्यमापकात सोयगावमध्ये सर्वाधिक पाऊस पडल्याची (१८.३० मिमी) नोंद आहे. शहरातील पाऊस मात्र रस्ते भिजतील, एवढाच होता. गेल्या २४ तासांत खुलताबादवगळता अन्य तालुक्यात पडलेल्या पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे : सर्व आकडे मिमीमध्ये – औरंगाबाद (५.९), फुलंब्री (१३.३०), पैठण (३.१०), सिल्लोड (१०.३०), सोयगाव (१८.३०), कन्नड (१७.३१), वैजापूर (१७.४०), गंगापूर (९.३०).
पावसाने हजेरी लावल्याने बळीराजाची लगबग व चिंता मात्र वाढली आहे. अजूनही दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना बियाणे व खतांसाठी कसलीही मदत सरकारकडून मिळाली नाही. फळबागांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. गेल्या खरीप आणि रब्बी हंगामात हाती काही लागलेच नाही, तरीही नव्याने बियाणे मिळविण्यासाठी शेतकऱ्यांनी बाजारपेठ गाठली. कापसाचे बियाणे पदरी पडावे म्हणून आतापासूनच रदबदली लावून ठेवली जात आहेत.
मराठवाडय़ातही पावसाने हजेरी लावली. बीड जिल्ह्य़ात अंबाजोगाई, परळी व केज भागात रविवारी सायंकाळी, तर सोमवारी बीडसह काही भागात पावसाने हजेरी लावली. अनेक ठिकाणी जोराच्या वाऱ्यासह पावसाने झोडपून काढले. दरम्यान, या पावसाने उकाडा चांगलाच वाढला असून पाऊस चांगला होईल, या आशेने शेतकरी बियाण्यांच्या खरेदीसाठी बाजारात आला आहे. उस्मानाबाद शहरात सोमवारी पावसाने हजेरी लावली, पण त्याने नुसते तोंड दाखविल्यासारखे केले. काही ठिकाणी पावसाच्या सरी येऊन गेल्या. परभणीचे जिल्ह्य़ात मानवत परिसरात सायंकाळी पाच ते सहाच्या दरम्यान वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. वादळी वाऱ्यामुळे राष्ट्रीय महामार्गावर काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली, घरावरील पत्रे उडाले.