राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत केटीएस व गंगाबाई रुग्णालयातील ६५ कंत्राटी कक्षसेवकांचे ३ महिन्यांपासून वेतन रखडल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत एप्रिल २०१३ मध्ये ६० ते ६५ कक्षसेवकांची कंत्राटी व रोजंदारी तत्वावर भरती करण्यात आली. यात नागपूर, वर्धाकडील बरेच कर्मचारी असून भाडय़ाच्या खोलीत राहत आहेत. १६० रुपये अशा तुटपुंजा मजुरीवर घेण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना मागील ३ महिन्यांपासून वेतन मिळाले नसल्याने त्यांच्यात कमालीचा असंतोष पसरला आहे. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान व जिल्हा परिषद व जिल्हा शल्यचिकित्सक यांच्यातील असमन्वयामुळेच वेतन रखडल्याचा आरोप अन्यायग्रस्तांनी केला आहे. बाहेरील जिल्ह्यातून आलेले बेरोजगार युवक असल्याने स्वत:च्या घरून मनिऑर्डर बोलावून गोंदियात कशीबशी गुजराण करीत आहेत. तीन महिन्यांचे वेतन रखडल्यामुळे कंत्राटी कक्षसेवकांची दैनंदिनी कठीण झाली आहे. उधारीमुळे डबेवाला त्यांना जेवणाचा डबा देत नाही, अशी आपबिती त्यांनी ‘लोकसत्ता’ ला सांगितली. कंत्राटी कक्षसेवक ज्या विभागात काम करतात त्या विभागातील रुग्णांकडून चिरीमिरी घेण्याच्या प्रकाराला वेतन रखडल्यामुळे प्रोत्साहन मिळत आहे. कक्षसेवकांबरोबरच भरती केलेला प्रयोगशाला तंत्रज्ञ, सहायक, अटेंडट, स्वीपर, तसेच कंत्राटी फार्मासिस्ट व राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत घेतलेले आयुषचे डॉक्टर्स, कॉलसेंटरचे डाटा एण्ट्री ऑपरेटर, वॉर्ड बाय यांचे सर्वाचे एप्रिलपासूनचे वेतन रखडले आहे. अधीक्षकांना याचे गांभीर्य नाही. वेतन रखडल्यामुळे केटीएस व बाई गंगाबाईच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांमध्ये प्रशासनाविरुद्ध प्रचंड असंतोष आहे.