विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर होणाऱ्या लक्ष्मीदर्शनाचा काहीसा फायदा शहरातील हॉटेल व्यावसायिकांनी आणि महिला बचत गटांनीदेखील घेतला. नाश्त्याच्या पदार्थासह मागणी असलेली बिर्याणी, पुलाव आदी पदार्थाच्या दरात वाढ करण्यात आली आहे. ही दरवाढ फक्त मतदानाच्या दिनानिमित्त करण्यात आल्याची माहिती हॉटेलचालकांनी दिली आहे. मात्र कार्यकर्त्यांसाठी ‘कायपण’ असा आविर्भाव आणत उमेदवारांनीदेखील त्यासाठीचे जादा पैसे मोजले.
मागील दीड महिन्यापासून आरोप-प्रत्यारोपामुळे नवी मुंबई राजकीय फड चांगलाच तापला होता. बुधवारी मतदानाच्या दिवशी सर्वच ठिकाणी कार्यकर्त्यांची गर्दी पाहावयास मिळाली. मतदानानिमित्त असलेली सुट्टी आणि मतदान यांचा दुहेरी संगम सांधत कार्यकर्त्यांनी पोटभर मेजवाणीचा आनंद लुटला. मात्र दुसरीकडे हॉटेल व्यावसायिकांनीदेखील आपली खिसेभरणी केली. मतदानाचा योग साधत हॉटेल व्यावसायिकांनी व्हेज बिर्याणीसह, चिकन आणि मटण बिर्याणी, त्याचबरोबर सकाळच्या नाश्ता आणि चहा यांचे दर १० ते २० रुपयांनी वाढविले. एरवी पोळीभाजीचे २५ ते ३० रुपयांपर्यंत असणारे दर आज १० रुपयांनी वाढले होते. दैनंदिन खवय्यांची मिसळदेखील पाच रुपयांनी तिखट झाली होती.  
निवडणुकीच्या दिवशी ऐरोली आणि बेलापूर मतदारसंघांत संध्याकाळच्या वेळी लागणाऱ्या वडापाव आणि चायनीज पदार्थाच्या गाडय़ा सकाळपासूनच विविध पक्षाच्या बूथ परिसरात ठाण मांडून बसल्या होत्या. अनेक महिला बचत गटांना उमेदवारांनी आश्वासनांची खरात दिली. मतदान दिनाचा मुहूर्त साधत अनेक नव्या महिला बचत गटांनी जेवण बनवण्यासाठी ऑर्डर्स घेतल्या होत्या. एरवी आश्वासन देऊन गायब होणारे राजकीय नेते मात्र महिला बचत गटांसाठी आज पुढे सरसावले होते.  

राजकीय नेत्यांनी मोठय़ा हॉटेलपेक्षा महिला बचत गटांना पोळी आणि भाजीचे एक दिवसाचे काम दिले आहे. त्यामुळे या निवडणुकीत आम्हाला एक रोजगार मिळाला आहे. आम्ही जवळजवळ ५०० माणसांची जेवणाची ऑर्डर घेतली आहे. निवडणूक येते आणि जाते. आम्हाला मिळालेल्या कामात आम्ही समाधानी आहोत.  -सुमन जाधव, सदाफुली महिला बचत गट