जिल्हा परिषदेतील निधी वितरणातील गोंधळ तसा सर्वश्रुतच. सत्ताधारी विरोधकांना डावलून विकास कामांसाठी निधीचे वाटप करत असल्याच्या तक्रारी वारंवार होत असतात. निधी वितरणातच नव्हे तर, जिल्हा परिषदेतील मनसबदारांकडून इतरही बाबींवर मुक्तहस्ते खर्च केला जातो, ही बाब माहितीच्या अधिकारान्वये उघड झाली आहे. २०१२ ते १३ या वर्षांत सर्वसाधारण सभा व स्थायी समितीच्या सभांसह इतर विषय समित्यांकडून चहापान, अल्पोपहार, पुष्पगुच्छ यावर हजारो रुपये खर्च करण्यात आले. तर जिल्हा परिषद अध्यक्षांच्या वाहनावरील इंधन खर्च जवळपास अडीच लाखांच्या घरात जाणारा आहे.
जिल्हा परिषदेतील पदाधिकारी, सदस्य व विविध समित्यांकडून केल्या जाणाऱ्या खर्चावर या माध्यमातून प्रकाश पडला आहे. एप्रिल २०१२ ते मार्च २०१३ या कालावधीतील खर्चाची ही माहिती आहे. शिक्षण व आरोग्य समितीमार्फत चहापान व अल्पोपहार यावर ४७ हजार ५७६ रुपये खर्च करण्यात आले. वाहनांतील इंधनावर तीन लाख ९ हजार ९११ तर वाहन दुरुस्तीवर ३८, ९०३ रुपये खर्च झाले.
पशुसंवर्धन विभागाकडून चहापान व अल्पोपहार आदींवर कोणताही खर्च झालेला नाही. पशुसंवर्धन समितीच्या दोन सदस्यांच्या प्रवास भत्त्यापोटी चार हजार ९७२ रुपये खर्च झाल्याचे या विभागाने म्हटले आहे. वर्षभरात या विभागाने कोणतेही दौरे केले नाहीत अन् कोणी राजकीय मंडळींनी या विभागास भेट दिली नसल्याने कोणताही खर्च करण्यात आलेला नाही.
वर्षभराच्या काळात कृषी समितीच्या १२ बैठका झाल्या. त्यात अल्पोपहार व चहापाणी यावर १८ हजार ४५ रुपये खर्च झाले. पुष्प गुच्छ व हार यावर कोणताही खर्च झालेला नाही. जिल्हा परिषदेचे उपसभापती तथा कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती यांच्या वाहनावर डिझेलसाठी दोन लाख २७ हजार ७२६ रुपये खर्च झाले. जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा आणि स्थायी समिती सभा यामध्येही अल्पोपहार, पुष्पगुच्छ, हार यावर हजारो रुपये खर्च झाल्याचे लक्षात येते. सर्वसाधारण सभेत किमान सहा तर कमाल आठ हजार रुपये खर्च झाले आहे.
स्थायी समितीच्या सभेवरील खर्च किमान १३८० ते कमाल आठ हजार रुपयांपर्यंत आहे. जि. प. सदस्य, पंचायत समिती सभापती, गटविकास अधिकारी यांच्या प्रशिक्षण वर्गातील अल्पोपहार व चहापानावर १२, ९०० रुपये खर्च करण्यात आले. या घडामोडीत महिला सशक्तीकरण अभियान सभेतील खर्च अतिशय कमी म्हणजे केवळ ३७५ रुपये आहे. वर्षभरात जिल्हा परिषद अध्यक्षांच्या दिमतीला असणाऱ्या वाहनास दोन लाख ३२ हजार ४२२रुपयांचे इंधन लागले. दुरुस्तीसाठी २५ हजार २३३ रुपये खर्च करण्यात आले.
बांधकाम समितीकडून जिल्हा परिषद सदस्यांवर चहापान व अल्पोपहारावर ५५ हजार, ५४९ रुपये खर्च झाले. तसेच बांधकाम व अर्थ समितीचे सभापती यांच्या शासकीय वाहनावरील इंधन व दुरुस्तीसाठी दोन लाख ६९ हजार रुपये खर्च झाले. या खर्चाची माहिती माहितीच्या अधिकारान्वये मुकुंद बेणी यांनी मिळविली आहे.