केबल कर्मचारी किंवा प्लंबर असल्याचे सांगून इमारतीत प्रवेश मिळवून तेथे टेहाळणी करून बंद असलेल्या घरात घरफोडी करणारी टोळी गुन्हे शाखेच्या युनिट १ जेरबंद केली आहे. नवी मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतील तब्बल ११ गुन्हांची कबुली या टोळी दिली आहे. त्यांच्याकडून २१ तोळे सोन्याच्या दागिन्यांसह सुमारे चार लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याचे गुन्हे शाखा पोलीस उपआयुक्त सुरेश मेंगडे यांनी दिली आहे.
परशुराम उर्फ परशु विलास शेंडगे, अशरत उर्फ शाहरुख हनिफ शेख , अझर ख्वाजा पाशा खान, आणि दीपक पतंगे अशी या अटक करण्यात आलेल्या चोरटय़ांची नावे आहेत. सर्वजण अंधेरी येथे राहणारे असून या टोळीचा मास्टरमाईण्ड परशुराम हा नुकताच मुंब्रा येथे राहायला आला होता. ही टोळी दिवसा घरफोडी करायची. या टोळीची माहिती युनिट १चे पोलीस निरीक्षक मालोजी शिंदे यांना मिळाली.  त्याआधारे त्यांचे सहकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे, पोलीस उपनिरीक्षक भारत जाधव यांच्या पथकाने सापळा लावून या चौघांना अटक केली असल्याचे मेंगडे यांनी सांगितले. हे चौघेही केबल कर्मचारी अथवा प्लंबर असल्याचे सांगून इमारतींमध्ये प्रवेश मिळवायचे. त्यानंतर त्यातील दोनजण लिफ्टने शेवटच्या मजल्यावर जाऊन जिन्यावरून पायी चालत खाली यायचे. दरम्यान, एखादे घर बंद दिसल्यानंतर तेथे घरफोडी करायचे. इतर दोघे हे लिफ्ट व जिन्याजवळ पाळत करत राहायचे. या टोळीकडून शहरातील ११ गुन्ह्य़ांची उकल करण्यात आली आहे. यामध्ये कोपरखैरणे पोलीस ठाणे ५, तुभ्रे पोलीस ठाणे २, नेरुळ पोलीस ठाणे १, रबाले एमआयडीसी पोलीस ठाणे १, खारघर पोलीस ठाणे १, एपीएमसी पोलीस ठाणे १  अशा घरफोडय़ांचा गुन्ह्य़ांचा समावेश आहे.