दीपावलीची धामधूम सुरू झाली असतानाच शहरातील पाथर्डी शिवारातील मोंढे वस्तीवर गुरुवारी मध्यरात्री दरोडेखोरांनी चढविलेल्या प्राणघातक हल्ल्यात दहा वर्षीय मुलासह आई जागीच ठार तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले. जखमींमध्ये आजी-आजोबांचा समावेश असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. शहरापासून जवळच घडलेल्या या घटनेमुळे शहरवासीयांमध्ये खळबळ उडाली आहे.
पालिका हद्दीतील पाथर्डी शिवाराचा बहुतेक भाग अद्याप शेतीचा आहे. या ठिकाणी मळ्यांमध्ये निवासी वस्ती विखुरलेली असल्याची बाब दरोडेखोरांनी हेरली. पाथर्डी गावाकडून गौळाणेकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोंढे मौडे वस्तीवर मध्यरात्री दरोडेखोरांची टोळी धडकली. आसपासच्या वस्त्यांवरून प्रतिकार होऊ नये म्हणून त्यांनी काही घरांना आधीच बाहेरून कडय़ा लावल्या आणि मोरे यांच्या घराकडे मोर्चा वळविला. या वेळी राजश्री संपत मोरे (३५), त्यांचा मुलगा अनुज संपत मोरे (१०), सासरे एकनाथ कचरू मोरे (६५) आणि सासू हिराबाई एकनाथ मोरे (६०) हे सर्व कुटुंबीय गाढ झोपेत होते. संपत मोरे हे काही कामानिमित्त बाहेर गेले असल्याने ते घरात नव्हते. चोरटय़ांनी दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश केला. या वेळी झालेल्या आवाजाने जागे होऊन आरडाओरड वा प्रतिकार करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना त्यांनी बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यातच राजश्री मोरे व त्यांचा मुलगा अनुज यांचा मृत्यू झाला तर सासू-सासरे गंभीर जखमी झाले. मध्यरात्रीच्या सुमारास घडलेल्या या घटनेची सकाळपर्यंत कोणाला माहिती नव्हती. ज्या घरांना कडय़ा लावल्या होत्या, त्या शेतकऱ्यांनी सकाळी आसपासच्या घरांमध्ये माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता ही घटना उघडकीस आली.
त्यानंतर पोलिसांशी संपर्क साधण्यात आला. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल, उपायुक्त डॉ. डी. एस. स्वामी यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. श्वानपथकाला पाचारण करून दरोडेखोरांचा माग काढण्यात आला. दरोडेखोरांनी महिलांच्या अंगावरील काही दागिने लंपास केल्याचा संशय आहे. घरात मोठी रक्कम नसल्याने त्यांच्या हाती फार काही लागू शकले नाही. गंभीर जखमी असलेल्या एकनाथ व हिराबाई मोरे यांना एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृतीही चिंताजनक आहे. संपत मोरे काही कामानिमित्त घराबाहेर असताना त्यांचे संपूर्ण कुटुंबीय दरोडेखोरांच्या हल्ल्यात सापडले. या घटनेत मरण पावलेला अनुज सेंट थॉमस स्कूलमध्ये इयत्ता पाचवीत शिक्षण घेत होता. या घटनेमुळे पाथर्डी शिवारातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेची माहिती समजल्यावर स्थानिकांनी मोंढे वस्तीवर एकच गर्दी केली होती. आ. वसंत गीते, महापौर अ‍ॅड. यतिन वाघ, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष विजय करंजकर, पालिकेतील विरोधी पक्षनेते सुधाकर बडगुजर आदींनी या ठिकाणी भेट दिली. दरोडय़ाप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी वेगवेगळी पथके स्थापन करून दरोडेखोरांचा शोध सुरू केला आहे. दरम्यान, दिवाळीनंतर बहुतेक कुटुंबे पर्यटनासाठी जातात. ही संधी चोरटे साधतात. मागील काही वर्षांत दिवाळीनंतर शहरात चोरी व घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येते. या पाश्र्वभूमीवर, नागरिकांनी बाहेरगावी जाताना घराच्या सुरक्षिततेसाठी योग्य ती दक्षता घेणे गरजेचे असल्याचे पोलीस यंत्रणेकडून सांगितले जात आहे.