‘दि मुंबई डिस्ट्रिक्ट को-ऑप. हाऊसिंग फेडरेशन’च्या पंचवार्षिक निवडणुकीत फेडरेशनचे विद्यमान संचालक प्रदीप सामंत यांच्या नेतृत्वाखाली ‘स्व. रघुवीर सामंत पॅनेल’ने दणदणीत विजय मिळवला. या पॅनेलचे सर्व १५ उमेदवार सुमारे दोन तृतियांश मताधिक्क्याने विजयी झाले.
हाऊसिंग फेडरेशन नावारूपाला आणण्यात मोलाचे योगदान देणारे स्व. रघुवीर सामंत यांच्या निधनानंतरची ही पहिलीच निवडणूक होती. त्यांना मानणाऱ्या. त्यांच्यासोबत काम केलेल्या कार्यकर्त्यांनी प्रदीप सामंत यांच्या नेतृत्वाखाली ‘स्व. रघुवीर सामंत पॅनेल’मार्फत निवडणूक लढवली होती. तर अ‍ॅड. वडेर व अनिल सावंत यांच्या नेतृत्वाखाली ‘श्रीसमर्थ सहकार पॅनेल’ मैदानात उतरले होते. दोन्ही पॅनेलमध्ये चुरशीची लढाई होईल, असा अंदाज वर्तविला जात होता.
 प्रत्यक्षात सामंत पॅनेलच्या सर्व उमेदवारांनी सुमारे दोन तृतियांश मतांनी दणदणीत विजय मिळवला. प्रदीप सामंत यांच्यासह हरी गोरे, विनय शेर्लेकर, अनिल जाधव, दिलीप नागवेकर, एम. एस. करजगीखेड, सयाजी झेंडे, डायना मेनेझेस, बी. डी. जगताप, तानाजी यटम, ज्ञानेश्वर गोसावी, विश्वास उंबरे, छाया आजगावकर, अनुश्री माळगावकर, सारिका सावळ हे उमेदवार विजयी झाले आहेत.
स्व. सामंत यांच्या विचारांनुसार फेडरेशनच्या कामात पारदर्शकता, आधुनिकीकरण आणून गृहनिर्माण संस्थांच्या सदस्यांना सोयीचे व्हावे अशा प्रकारे कामकाजात सुधारणा करण्यावर विशेष भर दिला जाईल, अशी प्रतिक्रिया प्रदीप सामंत यांनी निकालानंतर व्यक्त केली.