थोडी सुबत्ता आली की घरातील कपडे धुण्याच्या कामापासून मुक्त होण्यासाठी कामवाल्या मावशींचा आधार घेण्याची पद्धत सुरू होऊन बरीच वर्षे झाली. केवळ नोकरदार महिलाच नाही तर घरी असणाऱ्या गृहिणींनीही तोच पर्याय निवडला. आता मात्र वर्षांनुवष्रे चार घरची धुणी-भांडी करून संसाराचा गाडा ओढणाऱ्या मोलकरणींनीही कपडे धुण्याच्या कामासाठी नकारघंटा वाजवण्यास सुरुवात केली आहे. इतर कामांच्या तुलनेत शारीरिक श्रम आणि वेळ जास्त लागत असल्याने या कामासाठी नकार व ‘वॉशिंग मशीन वापरा’ असा सल्ला ऐकण्याची वेळ घरमालकिणींवर येत आहे.
घरखर्चाला हातभार लावण्यासाठी आणि आता करिअरसाठी घरच्या लक्ष्मी सकाळी उठून बाहेर पडू लागल्या तेव्हा त्यांना मदतीचा हात दिला तो घरकाम करणाऱ्या महिलांनी. घरची धुणी, भांडी, केर काढणे-लादी पुसणे अशा कामात मदतीचा हात मिळाल्याने अनेक गृहिणींसाठी घर आणि काम ही कसरत थोडी सुसह्य झाली.  स्वयंपाकघरातील मदतीसाठी स्त्रियांनी मिक्सर-फूड प्रोसेसर, ओव्हन यांना हाताशी धरले असले तरी अजूनही कपडे धुण्यासाठी वॉशिंग मशीनपेक्षा घरकाम करणाऱ्या मावशींच्या ‘हात की सफाई’ला अधिक मागणी आहे. नानाविध प्रकारच्या आधुनिक वॉशिंग मशीन आल्या तरी शर्टाच्या कॉलर, रंग जाणारे कपडे, कशिदाकारी-वेलबुट्टी केलेले कपडे यंत्रात टाकण्यासाठी गृहिणी तयार नसतात. जीन्स, चादरी अशा वजनदार धुण्यासाठी यंत्र कामी येत असले तरी रोजच्या धुण्यासाठी मात्र घरकाम करणाऱ्या महिलांनाच पसंती दिली जाते. त्यातही यंत्रामध्ये लागणाऱ्या पाण्यापेक्षा हाताने धुणी धुवायला पाणी कमी लागते हाही एक फायदाच.
आता मात्र अनेक ठिकाणी भांडी, केर-लादी, स्वयंपाक यासारख्या कामासाठी तत्पर असलेल्या महिला कपडे धुण्यासाठी नाक मुरडू लागल्या आहेत. साधारणपणे शहरात धुणी- भांडी – लादी यांचे दर ठरलेले असतात. भांडी धुणे व लादी पुसण्याचे काम पटापट होत असले तरी साधारण तेवढेच पसे मिळत असलेले कपडे धुण्याचे काम करण्यात मात्र जास्त वेळ लागतो. त्यातच खाली वाकून करण्याचे काम, सतत पाण्यात राहिल्याने शरीरावर ताण येत असल्याची तक्रार बोरीवली येथे घरकाम करणाऱ्या पुष्पा यांनी केली. धुण्याचे काम नको वाटते, बरीच वष्रे काम करणाऱ्या घरात आता नकार देता येत नाही, पण नव्याने काम घेताना आम्ही आधीच नाही म्हणतो, असे त्यांनी सांगितले.
घरात वॉिशग मशीन असल्याने अनेक ठिकाणी धुण्याची कामे तशी कमी झाली आहेत. पण नाही म्हटले तरी लहान मुले असलेल्या घरातील कपडय़ांची संख्या अचानक जास्त होते, मग ते करता करता पुढच्या घरी कामाला जाण्यासाठी वेळ लागतो व त्यांची बोलणी खावी लागतात. बेसिनमध्ये पडलेली भांडी उभ्याने काम करायचे असल्याने झटपट धुऊन होतात. अनेक घरात आता वॉिशग मशीनमध्येच कपडे धुतले जातात, आम्ही ते फक्त वाळत घालतो, असे गोरेगाव येथील मंगला सोनटक्के यांनी सांगितले.
शिवाजी पार्क परिसरात घरकाम करणाऱ्या भारती यांनाही धुणी धुण्यासाठी जास्त श्रम करावे लागतात, असे वाटते. त्यातच प्रत्येकाच्या घरी कपडे धुण्याची वेगवेगळी पावडर वापरली जाते. त्यामुळे अनेकदा हाताला अ‍ॅलर्जी होते. डॉक्टरकडे पसे खर्च करावे लागतात. आता तर लादी पुसतानाही आम्ही ब्रॅण्डेड फिनाइलचाच आग्रह धरतो, असे त्या म्हणाल्या.

धुणी नाकारण्याची कारणे
*  इतर कामांच्या तुलनेत अधिक वेळ लागतो.
* बराच वेळ कंबरेत वाकून काम करावे लागते.
* पाण्यात काम करावे लागते आणि दिवसभर अंगावरचे कपडे ओले राहतात.
* वॉशिंग पावडरमुळे हातांना अ‍ॅलर्जी होते.