गेल्या पाच सहा वर्षांत घरगुती फराळाची परंपरा बदलली असून घरी पदार्थ बनविण्यापेक्षा रेडिमेड फराळ खरेदी करण्याकडे महिलांचा कल वाढल्यामुळे विविध सामाजिक संस्थांना आणि बचत गटाच्या महिलांना त्यातून मोठय़ा प्रमाणात रोजगार मिळाला आहे.
दिवाळीमध्ये चकली, अनारसे, चिवडा, बेसनाच्या वडय़ा आदी पदार्थ घरोघरी तयार केले जात असताना बाजारात ती उपलब्ध झाली आहे. विविध स्वयंसेवी संस्थानी त्यासाठी पुढाकार घेतला असून त्यातून अनेक गोरगरीब महिलांना रोजगार मिळवून देण्याचा प्रयत्न आहे. विदर्भातील प्रत्येक जिल्ह्य़ात किमान पाच ते सहा बचत गट असून त्यांच्यामार्फत दिवाळीच्या फराळाचे पदार्थ तयार केले जात आहे. नोकरदार, व्यावसायिक महिलांबरोबरच गृहिणीदेखील फराळाची ऑर्डर देणे पसंत करीत आहेत. काही ठिकाणी कॉलनीतील, अपार्टमेंटमधील महिला एकत्र येऊन फराळाची एकत्रित ऑर्डर आचाऱ्याला देतात. भाजणी भाजा, ती दळून आणा, किराणा आणा, त्यासाठी वेळ काढा या भानगडीत न पडता सरळ फराळाच्या स्टॉल्सवर खरेदी करण्याचे प्रमाण अलीकडच्या काही वर्षांत वाढले आहे. कपडे, दागिने, सौंदर्यप्रसाधने, मिठाई, आकाश कंदील यांच्या खरेदीबरोबरच रेडिमेड फराळ आणण्याला प्राधान्य दिले जात आहे.
नागपूर शहरात महाल, नंदनवन, पाचपावली या भागात बचत गट चालविले जात असून त्या माध्यमातून महिला फराळाचे पदार्थ तयार करून त्यांची बाजारात विक्री करीत आहेत. बचत गटाशिवाय अनेक घरातील महिला चिवडा, चकली, लाडू शंकरपाळे आजी फराळाचे पदार्थ तयार करून देत आहेत. त्यासाठी किमान ४०० ते ५०० रुपये आकारले जात आहेत. महालातील गोखले किराणा, सीताबडीवरील बापट शॉपमध्ये चकली, करंजी, बुंदीचे, मोतीचुराचे, रवा-बेसनाचे लाडू, बालूशाही, साधी आणि मसाला शेव, पालक शेव, शंकरपाळे, तीन ते चार प्रकारचा चिवडा आदी विविध पदार्थ विक्रीला आहे. साखर, तेल, मैदा आदी वस्तू महाग झाल्याने गेल्यावर्षीपेक्षा यावर्षी फराळाच्या पदार्थाचे दर २० चे २५ टक्क्य़ांनी वाढल्याचे दामोदर गोखले यांनी सांगितले. रामनगरमध्ये सुरूचि महिला मंडळाच्या महिलांनीफराळाचे पदार्थ तयार केले असून त्याच ठिकाणी विक्री केली जात आहे. पांढराबोडी आणि मंडळातील काही महिला सदस्य अशा २५ महिला या ठिकाणी दिवसभर फराळाचे पदार्थ तयार करून बाजारपेठेत माल पाठवितात. १२ चकल्याचे पाकिट ६० रुपयाला, अनारसे १५० रुपये किलो, चिवडा ६५ रुपये किलो, शंकरपाळे ५० रुपये किलो प्रमाणे विक्रीला आहेत.