केंद्र सरकारच्या एकात्मिक शहर व झोपडपट्टी विकास योजनेंतर्गत (आयएचएसडीपी) शहरात महानगरपालिकेमार्फत सुरू असलेल्या ४८० घरकुलांच्या बांधणीची हुडकोच्या राज्य व केंद्रातील अधिकाऱ्यांनी पाहणी केली. वेळेत ही योजना पूर्ण करण्याची ग्वाही महापौर शीला शिंदे यांनी या वेळी दिली.
हुडकोच्या वित्त विभागाचे कार्यकारी संचालक के. के. गुप्ता (नवी दिल्ली), सरव्यवस्थापक सतीश गुप्ता, व्यवस्थापक गगन मोदानी (मुंबई) यांचा या पथकात समावेश होता. नगरोत्थान योजनेतून सुरू असलेल्या बालिकाश्रम रस्त्याचीही या पथकाने पाहणी केली. मनपाचे आयुक्त विजय कुलकर्णी, शहर अभियंता एन. डी. कुलकर्णी, यांत्रिकी अभियंता परिमल निकम, प्रकल्प अभियंता आर. जी. मेहेत्रे, आदी या वेळी उपस्थित होते.
 शिंदे यांनी सांगितले, की या पथकाने या कामांबद्दल समाधान व्यक्त केले. या कामांना गती मिळावी, ती वेळेत पूर्ण व्हावीत, यासाठी मनपाच्या स्तरावर विशेष प्रयत्न केले जात आहेत. घरकुलांच्या इमारतींचे काम सध्या प्रगतिपथावर असून लाभधारकांना सदनिकेची माहिती व्हावी यासाठी नमुना सदनिका प्राधान्याने तयार करण्यात येत आहे. आयुक्त कुलकर्णी, अभियंता कुलकर्णी व प्रकल्प अभियंता मेहेत्रे यांनी त्यासाठी विशेष परिश्रम घेतले असे शिंदे यांनी सांगितले.