आकाश हे उघडे पुस्तक आहे. इतर कोणतेही पुस्तक अभ्यास करायला उघडावे लागते, पण आकाशाचे पुस्तक सदैव उघडलेलेच असते. रात्रीच्या वेळी नुसती नजर टाकायची आणि अभ्यास करावयाचा. तुमच्या याच अभ्यासाला आता तज्ज्ञ मार्गदर्शनाची जोड मिळणार आहे. प्रत्येक महिन्यात आकाशात दिसणाऱ्या, होणाऱ्या बदलांची माहिती देणारे ज्येष्ठ खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांचे हे मासिक सदर.

* चंद्र :  १९ जानेवारी रोजी रात्री ९.५९ वाजता पौष अमावास्येस प्रारंभ होईल. २० जानेवारी रोजी सायं. ६.४४ वाजता पौष अमावास्या पूर्ण  होईल. माघ महिन्याच्या नूतन चंद्रकोरीचे दर्शन २१ जानेवारी रोजी सायं. सूर्यास्तानंतर पश्चिम क्षितिजावर होईल. चंद्रकोरीचे दक्षिणेकडील शृंग जास्त उंच दिसेल.
* बुध ग्रह : बुध ग्रह २४ जानेवारीपर्यंत दररोज रात्रीच्या प्रारंभी पश्चिम क्षितिजावर श्रवण नक्षत्रात दर्शन देईल. २५ जाने.पासून ४ फेब्रु.पर्यंत तो सूर्य तेजात लुप्त झाल्यामुळे दिसू शकणार नाही. बुध ग्रह अंधूक दिसत असल्यामुळे तो ओळखणे तसे कठीण असते.
* शुक्र ग्रह : तेजस्वी शुक्र ग्रह रात्रीच्या प्रारंभी पश्चिम क्षितिजावर धनिष्ठा नक्षत्रात दर्शन देईल. २२ जानेवारी रोजी रात्रीच्या प्रारंभी पश्चिम आकाशात पाहा. चंद्र-शुक्र युती होणार आहे.
* मंगळ ग्रह : लालसर रंगात दिसणारा मंगळ ग्रह रात्रीच्या
प्रारंभी पश्चिम क्षितिजावर शततारक नक्षत्रात दिसेल. २३ जानेवारी रोजी चंद्र-मंगळ युती होणार आहे.  
* गुरू ग्रह : गुरू ग्रह रात्रीच्या प्रारंभी पूर्व आकाशात आश्लेषा नक्षत्रात छान दर्शन देईल. तुमच्याकडे दुर्बीण असेल तर त्यातून गुरू ग्रहाच्या चार चंद्रांचे दर्शनही होईल.
* शनी ग्रह : शनी ग्रह रात्रीच्या प्रारंभी आपणास दिसणार नाही. त्यासाठी आपणास पहाटे लवकर उठावे लागेल. पहाटे शनी अनुराधा नक्षत्रात मध्य आकाशात सुंदर दर्शन देईल. दुर्बिणीतून शनी ग्रहाची वलयेही छान दर्शन
देतात.

या महिन्यातील ठळक खगोलीय घटना
* १६ जानेवारी : चंद्र-शनी युती. शनी चंद्राच्या सुमारे दोन अंश दक्षिणेकडील बाजूस दिसेल. पहाटे मध्य आकाशात पाहावे.
* २१ जानेवारी : चंद्र-बुध युती. बुध चंद्राच्या तीन अंश दक्षिणेकडील बाजूस दिसेल. रात्रीच्या प्रारंभी पश्चिम क्षितिजावर पाहा.
* २२ जानेवारी : चंद्र पृथ्वीच्या जवळ ३,५९,६४५ कि.मीटर अंतरावर येईल.
* २२ जानेवारी : चंद्र-शुक्र युती. शुक्र चंद्राच्या सहा अंश दक्षिणेकडील बाजूस दिसेल. रात्रीच्या प्रारंभी पश्चिमेस पाहा.
* २३ जानेवारी : चंद्र-मंगळ युती. मंगळ चंद्राच्या चार अंश दक्षिणेकडील बाजूस दिसेल. रात्रीच्या प्रारंभी पश्चिम आकाशात पाहा.
* २९ जानेवारी : चंद्र-रोहिणी तारका युती. रोहिणी चंद्राच्या एक अंश दक्षिणेस दिसेल. रात्री आठ वाजता मध्य आकाशात पाहा.