भारतीय जनता पक्षात ओबीसीचे नेतृत्व म्हणून गोपीनाथ मुंडे यांचे नाव घेतले जाते. राष्ट्रवादीत छगन भुजबळ आहेत. काँग्रेसमध्ये आमचा असा ओबीसीचा नेता कोण, असा खडा सवाल आज काँगेसच्या कार्यकर्त्यांनी विभागीय मेळाव्यात केला. त्याला उत्तर न देता काँग्रेसने सुरु केलेल्या महत्त्वाच्या योजनांची माहिती सांगून ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष प्रमोद मोरे यांना वेळ मारून न्यावी लागली. या विभागीय मेळाव्यास आमदार आणि राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांनी हजेरी तर लावली, ती फक्त भाषणापुरतीच. माजी खासदार उत्तमसिंग पवार, आमदार एम. एम. शेख, अरुण मुगदिया आणि जिल्हाध्यक्ष केशवराव औताडे कार्यक्रमात स्वतचे भाषण होईपर्यंतच थांबले.
 औरंगाबाद शहर व ग्रामीण विभागातील कार्यकर्त्यांना दोन दिवसांपूर्वी निरोप पाठवून काँग्रेसच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यास काँग्रेस ओबीसी सेलचे अध्यक्ष प्रमोद मोरे, सचिव राजेंद्र महाले यांनी हजेरी लावली. जिल्ह्यातील काँगेसचे नेतेही उद्घाटनाच्या कार्यक्रमास उपस्थित होते. पण एकेकाचे भाषण झाले की ते निघून जायचे. माजी खासदार उत्तमसिंग पवार यांनी भाषणात हा समाज काँग्रेसच्या बाजूने कसे मतदान करतो, हे सांगितले. मात्र, या समाजाच्या समस्यांकडे नेते मंडळी लक्षच देत नसल्याचे ते म्हणाले. जात प्रमाणप्रत्र मिळत नाही. दर वेळी प्रमाणपत्र मिळविण्यासाठी पसे द्यावे लागतात. सरकार आपले आहे. मंत्री आपले आहेत पण सर्वसामान्यांचे प्रश्न सुटत नाही, असेही पवार म्हणाले. त्यांचे भाषण झाले ते निघून गेले. तत्पूवी कार्यकर्त्यांनी काँगेसमध्ये ओबीसीचे नेतृत्व म्हणून कोणाकडे पहावे, असा सवाल केला. त्याला आमदार एम. एम. शेख यांनी उत्तर देण्याचा प्रयत्न केला. एक आमदार ओबीसाचा असल्याचे सांगून काँग्रेसमध्ये योग्य न्याय मिळतो, असे सांगायला ते विसरले नाहीत. त्यांचे भाषण झाले ते निघून गेले. या भाषणादरम्यान कार्यकर्त्यांची ये-जा सुरु होती. यानंतर काँगेसचे महामंत्री अरुण मुगदिया यांनी भाषण केले. शहरातील कार्यकर्त्यांसाठी विविध सेलच्या अध्यक्षांनी कसा वेळ काढायला हवा. प्रश्न कसे सोडविले जावेत, यावर ते बोलेले. भाषण संपताच ते निघून गेले. त्यांनतर लातूरचे कार्यकत्रे संभाजी सूळ यांनी पुन्हा, आमचा नेता कोण, हा सूर लावून धरला. ५४ टक्के इतर मागासवर्गीय समाज असताना आमदार कोण, हे सांगायला नाव आठवावे लागते. आपल्या समस्या आपण ऐकायच्या, अशीच स्थिती असल्याचेही त्यांनी आवर्जुन नमूद केले. तत्पूर्वी जिल्हाध्यक्ष केशवराव औताडे यांनी काँग्रेस पक्ष कसा सर्व जाती-धर्माना बरोबर घेऊन जातो, याची उदाहरणे दिली. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शारदा जारवाल तसेच अनेक पंचायत समितीचे सदस्य ओबीसी समाजातील असल्याचे सांगितले . त्यांचे भाषण झाले आणि तेही निघून गेले. त्यांनतर ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष प्रमोद मोरे यांचे भाषण झाले. त्यांनी अन्न सुरक्षा विधेयक, सर्व शिक्षा अभियान व विविध सरकारी योजना आखून काँग्रेस सर्व सामान्यांबरोबर असल्याचे सांगितले. ओबीसी नेतृत्व शोधण्यापेक्षा संघटन मजबूत करा, असा सल्ला देत कार्यक्रमाचा समारोप केला. नेत्यांनी यावे भाषण करावे, निघून जावे, असेच चित्र संपूर्ण कार्यक्रमात दिसून आले.