आठवडाभरात शाळा सुरू होत असल्याने विद्यार्थी आणि पालकांनी तयारी सुरू केली असली तरी सांताक्रूझ पूर्व येथील प्रभात कॉलनी शाळा मात्र अजूनही अपूर्णावस्थेत आहे. पालिकेने ही शाळा दुरुस्त करण्याचे कंत्राट दिले असले तरी कंत्राटदाराने इमारतीची स्थिती अधिकच दयनीय केल्याचे शुक्रवारी शिक्षण समिती अध्यक्षांनी केलेल्या पाहणीत उघड झाले. शाळेची उर्वरित दुरुस्तीही आठवडय़ाभरात पूर्ण होण्याची शक्यता नसल्याने सुमारे ८५० विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे.
प्रभात कॉलनी शाळेच्या इमारतीच्या दुरुस्तीचे काम गेल्या वर्षी एप्रिलमध्ये हाती घेण्यात आले. इमारतीची दुरुस्ती, फरशी बदलणे, विजेच्या तारांचे काम करणे अपेक्षित होते. मात्र कंत्राटदाराने या कामासाठी निकृष्ट साहित्य वापरले असून त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची समस्या निर्माण होऊ शकेल, अशी तक्रार राजेश राणे यांनी शिक्षण विभागाकडे केली. त्यानंतर शिक्षण समिती अध्यक्ष विनोद शेलार यांनी शुक्रवारी या शाळेच्या दुरुस्तीची पाहणी केली. शाळेच्या प्रवेशद्वारापासून अनेक कामे निकृष्ट पद्धतीने करण्यात आली आहेत.
इलेक्ट्रीय वायरिंग उघडय़ावर असून जमिनीवरच्या फरशाही वर आल्या आहेत. सिलिंगलाही केवळ गिलावा करण्यात आला आहे. आठवडय़ाभरात उर्वरित कामही पूर्ण होणे शक्य नाही. तसेच या अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांचे वर्ग घेणेही धोकादायक आहे. त्यामुळे या प्रकरणी चौकशी करून विस्तृत अहवाल देण्यास पालिका अधिकाऱ्यांना सांगितले आहे, असे शिक्षण समितीचे अध्यक्ष विनोद शेलार म्हणाले.